Sugar Cane l ऊसाचे टनेज, साखर उत्पादन व साखर उताऱ्यात कोएम ८६०३२ पेक्षा सरस : फुले ०२६५ नंतर पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे 'हे' नवीन वाण साखर उद्योगात आणणार क्रांती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गेल्या ९० वर्षा पासुन ऊस पिकाचे विविध वाण व ऊसावरील सुधारित तंत्रज्ञान यावर शिफारशी देण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्रा राज्याकरिता अधिक ऊस उत्पादन (१६० टन/हेक्टरी) आणि अधिक साखर उत्पादन (२३.९२) टन/है) देणारा ऊसाचा नवीन वाण पाडेगाव संशोधन केंद्रामधील शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. 
        सन २०१२ पासून फुले ऊस १५००६ हा वाण केंद्र, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील चाचण्यामध्ये उत्तम असल्याचे आढळून आल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ५२ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती २०२४ मध्ये पार पडलेल्या बैठकीत फुले ऊस १५००६ हा नवीन वाण आडसाली पूर्वहंगामी व सुरू हंगामामध्ये महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आलेला आहे. मध्यवर्ती ऊस संशीधन केंद्र, पाडेगाव येथेच अधिक उत्पादन देणारा प्रचलित वाण फुले ०२६५ व अधिक साखर देणारा वाण की १४०१२ संकरातून निर्माण करून प्रसारीत केलेला आहे. एमएस १०००१, फुले ऊस १५०१२ तसेच फुले ऊस १३००७ नंतर फुले ऊस १५००६ हा ऊसाचा पाडेगाव संशोधन केंद्रावरच संकर करून निर्माण केलेला चौथा वाण आहे. 
    हा वाण मध्यम पक्वता गटातील आहे. २०१८ ते २०२० मधील ३० बहुस्थानीय चाचणीमध्ये फुले ऊस १५००६ या वाणाचे विविध प्रयोगामधील सरासरी ऊस उत्पादन व साखर उत्पन १९९६ साली प्रसारीत करण्यात आलेल्या को ८६०३२ या प्रचलित वाणापेक्षा अधिक आहे. 
      फुले ऊस १५००६ या नवीन वाणाचे ऊस उत्पादन व साखर उत्पादन अधिक असल्याने नवीन वाणाच्या शोधामध्ये असलेल्या सर्व ऊस शेतकरी व साखर कारखाने यांना यापासून अधिकचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नवीन वाणाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. क्षार जमिनीमध्ये या वाणाची उक्षवण क्षमता चांगली असल्याचे आढळून आलेले आहे. सदर वाण जाइ उंच वाढणारा, न लोळणारा, पाचट सहज निघणारा, पाचटावर कुस नसणारा आणि काणी रोगास प्रतिकारक असुन त्याचबरोबर चोपण जमिनीत चांगली उगवणक्षमता असणारा वाण आहे. तसेच हा वाण पाण्याचा ताण सहन करणारा आहे.
Tags
To Top