सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाल्हे : प्रतिनिधी
पुणे पंढरपूर महामार्गावरील पवारवाडी फाट्यावर जेजुरीहून निरेकडे भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून दुचाकीस्वार तिचा पती देखील गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक ७ डिसेंबर रोजी साय.६च्या दरम्यान दिलीप गजानन पवार हे आपल्या पत्नी छाया पवार यांना घेऊन दुचाकी (क्र.एम. एच.१२ एफ. एक्स ५७००) वरून आपल्या वाल्हे येथील घराकडे जात असताना पवार वाडी फाट्यावर त्यांच्या दुचाकीस जेजुरी हुन भरधाव वेगात निघालेल्या टी .एन. टी .कंपनीच्या कंटेनरने (क्र.एम. एच. १२ डब्ल्यू एक्स १७३९) पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकी वरील दिलीप पवार व त्यांच्या पत्नी छाया पवार गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच छाया दिलीप पवार ( रा. वाल्हे) यांचा मृत्यू झाला.
याबाबतची फिर्याद अनिल दिलीप पवार (वय २८)यांनी वाल्हे पोलीस चौकीत दाखल केली आहे. तर पोलिसांनी कंटेनरचा चालक रमेशसिंह सिताराम सिंह(मूळचा रा.बिहार) याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली पवार तसेच हवालदार भाऊसाहेब भोंगळे हे करीत आहेत.