Purandar News l गुळुंचेच्या प्रविण जोशींची पुस्तके दुबईच्या साहित्य संमेलनात !

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
निरा : विजय लकडे
गुळुंचे (ता. पुरंदर ) येथील  लेखक व कवी प्रविण जोशी यांच्या पुस्तकांनी दुबई येथे आयोजित साहित्य संमेलनात आपली मोहोर उमटवली. तेथील मराठी वाचक, साहित्यिक व समीक्षकांकडून वाहवा मिळविली. मुक्त सृजन संस्था व सृजन साहित्य पत्रिका यांच्या संयुक्त विद्यमाने ता. ०४ ते ११ डिसेंबर या कालावधीत पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दुबई येथे करण्यात आले होते. या संमेलनात श्री. जोशी यांची चार पुस्तके निवडण्यात आली होती. त्यातील पनव्या कादंबरीचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

     नंदीबैल घेऊन आयुष्य भटकंतीला बांधलेल्या जोशी जमातीचे चित्रण करणारी कादंबरी अल्पावधीत लोकप्रिय होत आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. मोना चिमोटे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक व लेखक डॉ. डी. एस काटे स्वागताध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.

     लेखक संतोष देशमुख, हेडाम या कादंबरीचे लेखक नागू विरकर, समीक्षक डॉ. पि. विठ्ठल, संत गाडगेबाबा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मोना चिमुटे यांच्या हस्ते पुस्तकांचे अनावरण करून बुर्ज खलिफा येथे दुबईकरांना तसेच पर्यटकांना प्रविण जोशी लिखित माणुसकीचा गाव, घरकुल, गल्हाटा व पनव्या या पुस्तकांची माहिती देण्यात आली. दरम्यान, १२७ ग्रंथांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

     शंकरराव भेलके महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. जगदीश शेवते यांनी मराठी साहित्यातील वैश्विकता या परिसंवादात मराठी साहित्याची भूमिका मांडली.  माजी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री रमाकांत खलप हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. डॉ. महेश खरात यांनी आभार मानले.

 “प्रविण जोशी यांच्या पुस्तकांची साहित्यिक, समीक्षकांनी प्रशंसा केली. भटक्या विमुक्तांचे जीवन रेखाटणारे तसेच प्रशासकीय अव्यवस्थेवर टीका करणारे जोशी यांचे लेखन उत्तम दर्जाचे आहे. ग्रामीण भागातल्या लेखकाचे साहित्य परदेशी गेले याचा आनंद आहे.” 
डॉ. जगदीश शेवते, परिसंवाद निमंत्रक मान्यवर.
To Top