सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इस्लामपूर : प्रतिनिधी
वाळवा येथे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका ऊस तोडणी महिला कामगाराचा मृत्यू झाला आहे.
दैवशाला बाळासाहेब आंधळे (वय ३७, मूळ आंधळेवाडी, ता. केज, जि. बीड, सध्या वाळवा) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेचा पती बाळासाहेब रामकिसन आंधळे याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद चुलत भाऊ अशोक व्यंकट आंधळे (वय ४२, मूळ आंधळेवाडी, ता. केज, जि. बीड, सध्या वाळवा) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार दि.१० रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास बाळासाहेब आंधळे, दैवशाला आंधळे उसाने भरलेली बैलगाडी वाळवा येथील नेमिनाथ नगरहून कारखान्याकडे नेत असताना उतार असणाऱ्या रस्त्यावरून उजव्या बाजूला वळण घेत असताना उसाने भरलेल्या बैलगाडीवर मागे बसलेली दैवशाला या बैलगाडीतून घसरून डाव्या बाजूच्या बैलगाडीच्या चाकाखाली पडल्या. अपघातात दैवशाला यांच्या छातीवरून बैलगाडीचे चाक जाऊन त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत् घोषित केले.