सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरवळ : प्रतिनिधी
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडी गावच्या हद्दीतील सारोळा पुलालगत महामार्गावरील खड्डा चुकवण्यासाठी दुचाकीचा वेग कमी झाला असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकच्या चाकाखाली आल्याने पुणे येथील आयटी क्षेत्रातील 25 वर्षीय आयटी इंजिनिअर युवतीचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीचालक युवक गंभीर जखमी झाला आहे.
यामध्ये रुबल राजीवकुमार सिन्हा(वय 25,सध्या रा.घुलेनगर,मांजरी बुद्रुक,ता.हवेली जि.पुणे, मूळ रा.डोंगागुडा, जयपुरे एलआर, कोरापुट, ओडिशा) असे जागीच मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे तर शहाऊद ईजाज अहमद शेख(वय 33,मूळ रा.एरंडोल,जि. जळगाव सध्या रा.पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. याबाबतची घटनास्थळावरून व शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,पुणे व मुंबई येथील एका कंपनीमधील मित्र शहाऊद शेख,रुबल सिन्हा हे दुचाकी (क्रं-एमएच-01-डीजे-8365)व शाहरुखअली शकुरअली शेख,मोहम्मदसलमान मोहम्मद कासीम शेख हे दुचाकी (क्रं-एमएच-05-सीझेड-7592)वरून महाबळेश्वर याठिकाणी पर्यटनासाठी येत असताना दुचाकी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील सारोळा पुलालगत असलेल्या शिंदेवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका हॉटेलसमोर आली असता महामार्गावर असलेल्या खड्डा चुकवत असताना दुचाकीचालक शहाऊद शेख याने दुचाकीचा वेग कमी केले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालट्रक(क्रं-पीबी-06-एयु-9995)वरील चालक सोनुकुमार नागेंद्र सिंग(रा.संगमनगर झोपडपट्टी,वडाळा, मुंबई) याने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेत दुचाकीवरील रुबल सिन्हा हे दुचाकीवरून खाली पडल्याने व मालट्रकचे चाक अंगावरून गेल्याने रुबल सिन्हा ही गंभीर जखमी होत जागीच ठार झाली तर दुचाकीचालक शहाऊद शेख हा गंभीर जखमी झाला.यावेळी घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदिप जगताप,सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास यादव,पोलीस अंमलदार अरविंद बा-हाळे,भाऊसाहेब दिघे व शिरवळ रेस्क्यू टिमचे सदस्य यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत करीत शिरवळ ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तर गंभीर जखमी शहाऊद शेख याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी शिरवळ पोलीस स्टेशन याठिकाणी मोहम्मदसलमान शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून मालट्रकचालक सोनुकुमार सिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरवळ पोलीसांनी मालट्रकचालक सोनुकुमार सिंग याला ताब्यात घेतले आहे.या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे ह्या अधिक तपास करीत आहे. चौकट- महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या शिंदेवाडी हद्दीत महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून महामार्गावर खड्डा चुकविताना झालेल्या अपघातात एका निष्पाप युवतीला आपला जीव गमवावा लागल्याने समाजमन हळहळले असून रस्त्याच्या दुरअवस्थेला जवाबदार असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.