सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपुर्ण ऊसाचे वेळेत गाळप करण्यासाठी व आपला हंगाम साधारणतः १८ ते २० मार्च पर्यंत संपविणेसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याने सभासद बांधवांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणटले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु असून कारखान्याने आजअखेर ७४ दिवसांमध्ये ६ लाख ७५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून यामधून सरासरी ११.३४ टक्के साखर उतारा राखत ७ लाख ६३ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले. आपल्या कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे. टन प्रतिदिन असताना देखिल प्रति दिवस ९ हजार १३४ मे. टनाच्या उच्चांकी सरासरीने आपण गाळप करीत आहोत. तसेच आपल्या कारखान्याच्या को-जन प्रकल्पामधून ४,४९,५९,९६३ युनिट्सची वीजनिर्मिती केली असून २,४८,६२,५७२ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून ३३,४०,८०३ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत २०,९३,१९१ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.
जगताप पुढे म्हणाले की, विशेष करुन कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील कारखान्यांनी राज्यभरात ऊस कमतरता असल्यामुळे जास्तीचा ऊस मिळविण्यासाठी एकरकमी दर देण्याच्या उद्देशाने पहिला हप्ता जाहिर केला असून त्यांचे अंतिम ऊस दराबाबत निश्चित धोरण दिसत नाही. याऊलट आपला कारखाना पहिली उचल प्रति मे.टन २८०० रुपये सभासदांच्या खात्यावर पंधरावडा संपताच वर्ग करीत आहोत. आजअखेर ५ लाख ६२, हजार २ मे. टन ऊसासाठी रक्कम १५७ कोटी ३६ लाख ऊस उत्पादकांना अदा करणेत आलेली आहे. त्याचबरोबर गाळपास येणाऱ्या पुर्व हंगामी ऊसास प्र.मे.टन ७५ रुपये, सुरु व खोडवा ऊसास प्र.मे.टन १५० रुपये प्रमाणे आपण अनुदान सभासदांच्या खात्यावर रक्कम वर्ग करणार आहोत. हंगाम संपल्यानंतर एफ.आर.पी. प्रमाणे उर्वरीत साधारणतः प्र.मे.टन ३५० रुपये असे एकूण प्र.मे.टन ३ हजार १५० रुपये व त्यापुढेही जावून गेली अनेक वर्ष उच्चांकी दर देण्याची आपली जी पंरपरा आहे ती या हंगामामध्येही आपण कायम राखणार आहोत. त्यामुळे सभासद व बिगर सभासद यांनी इतर कारखान्यांना ऊस न घालता आपल्याच कारखान्यास ऊस घालून सहकार्य करावे व कारखान्यास नोंद दिल्याप्रमाणे सहकार्य करावे.
संचालक मंडळाने नुकतेच आपल्या कारखान्याकडे सभासद, शेअर्स मागणीदार यांनी नोंदविलेला ऊस बाहेरील कारखान्यास घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत १ एप्रिल २०२५ पासून साखर देणे बंद करणार आहोत त्याचबरोबर कारखान्याकडून सवलतीमध्ये देणेत येणाऱ्या रोप व बेणे वाटप, प्रेसमड वाटप, ताग व धैंचा वाटप व इतर कारखाना सवलती देण्याचे आपण बंद करणार असून आपल्याच संस्थेला ऊस घालून सहकार्य करावे असे संचालक मंडळाचे वतीने आवाहन करतो. आपल्या कारखान्याचे सर्व संचालक, सर्व सभासद, कार्यकारी संचालक, अधिकारी, खातेप्रमुख, कामगार, ऊस तोडणी वाहतूकदार, ऊस तोड कामगार या सर्वांच्याच सहकार्यामुळे व आपल्या कारखान्याचे मार्गदर्शक अजितदादा पवार यांचे वेळोवेळी मिळत असलेल्या बहुमोल मार्गदर्शनामुळे आपल्या कारखान्यास साखर कारखानदारीत संपुर्ण राज्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट या संस्थेचे सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट फायनान्स मॅनेजर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार असे एकूण तीन पुरस्कार प्राप्त झाले असून तसेच आपल्या कारखान्याच्या सहविजनिर्मिती प्रकल्पास संपुर्ण देशभरातून को-जन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा समजले जाणारे हे संपुर्ण पुरस्कार आपल्या सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनामुळे कारखान्यास प्राप्त झाले असून यापुढील काळात देखिल आपल्या सर्वांचे सहकार्य असेच कायम मिळेल अशी खात्री बाळगतो.
-----------------------------
उसतोडीसाठी पैसे मागितल्यास लेखी तक्रार करा.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदांचा ऊस तोडण्यासाठी ऊसतोडणी कामगारांकडून पैशांची मागणी केली जाते. असे पैसे मागितले असतील तर त्याची लेखी तक्रार कारखान्याकडे करावी. कारखाना ती रक्कम ऊसतोडणी कामगाराच्या ऊस वाहतूक बिलातून वसूल करून ती सभासदांना दिली जाईल. असेही अध्यक्ष जगताप म्हणाले.