सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे मत बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी मांडले.
सुपे ( ता.बारामती ) येथील जीवन साधना फाऊंडेशन संस्थेच्यावतीने प्राजक्ता मतिमंद विद्यालयात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या ' सुरक्षित वाहतुक व अपघात टाळण्यासाठी.... ' या महत्वाच्या व संवेदनशील या विषयावर ग्रामस्थ तसेच कॉलेजच्या युवक व युवतींसाठी व्याख्यान झाले. यावेळी निकम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय काळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन सुप्याचे सपोनी मनोजकुमार नवसरे होते.
यावेळी निकम म्हणाले की भारतात परिस्थिती अशी आहे की सात लाख अपघात वर्षाला होतात. तर जगाच्या १५ टक्के अपघात या आपल्या भारतात होतात. त्यामुळे वाहतुकीचे नियम, सुरक्षा कायदे, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी या नियमांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की व्यसन करुन कोणतेही वाहन चालवु नये. तसेच दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर, तर चारचाकी चालवताना सीटबेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. कोणतेही वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळावे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अपघातात गेला तर कुटुंबाची वाहतात होत असते त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचा वापर केल्यास अपघात टळण्यास मदत होते. तर कमी वयात वाहन चालविल्यास त्याची शिक्षा माता पित्यांना होत असते असे निकम यांनी सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची चित्रफित दाखविण्यात आली.
दरम्यान, या विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षण म्हणून इंटरनॅशनल जादूगार शिवम यांचे जादूचे प्रयोग ठेवण्यात आले होते. तसेच जगदीश पुणेकर यांच्याही गीत गायनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. या दोन्ही कार्यक्रमास उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी सुपे पोलीस ठाण्याच्यावतीने खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी सुपेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका प्राजक्ता बसाळे यांनी केले. तर आभार गणेश भुजबळ यांनी मानले.