सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोरेगाव : देवानंद जमादार
अंबवडे संमत कोरेगाव येथील शेतामध्ये सुरू असलेल्या ऊस तोडणी दरम्यान हार्वेस्टर मशीन आणि फीडर ट्रॅक्टर मागे आले. त्याचवेळी उसाच्या कांड्या वेचत असलेले शेतकरी अरुण धर्माजी जाधव यांच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
सातारा जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केले असता तिथे त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी सात वाजता झाला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी आकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंबवडे संमत कोरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असलेले शेतकरी अरुण धर्माजी जाधव यांच्या शेतामध्ये किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून ऊस तोडणी सुरू होती. सोमवारी सायंकाळी हार्वेस्टर मशीन आणि त्यामागील फिडर ट्रॅक्टर पुढे चालला होता आणि अरुण जाधव हे खाली पडलेल्या उसाच्या कांड्या वेचून फिडर ट्रॅक्टरमध्ये टाकत होते अचानक हार्वेस्टर मशीन आणि फिडर ट्रॅक्टर मागे आला. या दरम्यान फिडर ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने अरुण जाधव हे गंभीर जखमी झाले. शेतातील ऊस तोडणी यंत्रणा थांबवून तेथील कामगारांनी शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचारार्थ हलविले, मात्र त्यांचा तिथे मृत्यू झाला.
याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.