सुपे परगणा l दिपक जाधव l दिवसाढवळ्या बंद घराचे कडी कोयंडा तोडून १० तोळे सोने लंपास : सुपे नजीक लोणकरमळा येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
घराला कुलुप असल्याचा फायदा घेत कडी कोयंडा तोडुन सुमारे १० तोळे अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना सुपे नजीक लोणकरमळा येथे सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. 
             येथे दिवसेंदिवस चोरीचे सत्र वाढत चालले असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. अशोक शंकराव लोणकर ( वय ५९, धंदा शेती, निवृत शिक्षक रा. सुपे, लोणकरमळा ता. बारामती जि. पुणे ) यांनी चोरी झाल्याची फिर्याद सुपे पोलिस स्टेशनला दिली.  
         लोणकर कुटुंबातील दोघेही घराबाहेर असल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेवुन घराचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश केला. यावेळी शयनकक्षात प्रवेश करुन कपाटाची तिजोरी फोडुन त्यातील दोन मोठ्या वाट्या असलेला सहा तोळ्याचा गंठण, दोन तोळ्याचा हार, १ तोळ्याचे, कर्णफुले आणि जोडे, ४ ग्रॅमची लक्ष्मी मुर्ती, २ ग्रॅम वेडणी मिळुन ९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोने मिळुन सुमारे ५ लाख ७० हजार किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. लोणकर कुटुंब घरी आल्यावरच ही घटना उघडकीस आली. घरानजीक असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दुचाकीवरुन तिघेजण आल्याचे दिसत असुन येथील पोलिस उपनिरिक्षक जिनेश कोळी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान बारामतीचे विभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, सुप्याचे सपोनी मनोजकुमार नवसरे यांनी घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली. 
     सद्या रब्बी हंगाम असल्याने बहुतांश शेतकरी घरांना कुलूप लावुन शेतातील कामे करण्यासाठी जात असतात. त्यामुळे घराला कुलुप असल्याचा फायदा अज्ञात चोरटी घेत आहेत. मागिल आठवड्यात खंडुखैरेवाडी येथील चोरी अद्याप उघडकीस आलेली नसताना पुन्हा ही घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 
......................................
To Top