सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे परिसरास वरदान ठरलेल्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या बंदनलिका प्रकल्पाचे प्रशासकीय मान्यतेबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र या बंदनलिका प्रकल्पास या परिसरातील ग्रामस्थांचा विरोध आहे. या जनाई योजनेची बंदनलिका प्रकल्प राबविल्यास येथील ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात जनाई योजनेचे मुख्य अभियंता यांना सुपे, दंडवाडी, पानसरेवाडी, नारोळी आणि कोळोली आदी गावांनी बंदनलीका प्रकल्पास विरोध असल्याचे पत्र दिले आहे.
सुपे येथुन जाणारा उजवा आणि डाव्या कालव्याला पश्चिम आणि पुर्वेकडे बंदनलिकेतुन पाणी घेवुन जाण्याचे शासनाचे नियोजन आहे. यामुळे सुपे, दंडवाडी अंतर्गत असणारी खोपवाडी, शेटेवाडी तसेच नारोळी, कोळोली आदी भाग पाण्यापासुन वंचित राहु शकतो. दंडवाडी परिसरात पाणी साठवुन ठेवण्याकरीता पुरेसा साठवण तलाव नाही. त्यामुळे भविष्यात पिके पाण्यावाचुन जळु लागतील अशी स्थिती निर्माण होवु शकते. त्यामुळे या ठिकाणाहुन जनाईची बंदनलिका प्रकल्पास येथील ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा विरोध डावलुन काम सुरु केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
...............................