सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
आपल्या महामानवांचे कार्य मोठे आहे. मात्र आपण महामानवांचा वारसा विसरलो असुन तो आपल्या मुलामुलींना सांगितल्याशिवाय सुस्कृंत समाजाची निर्मिती होणार नाही, ही काळाची खऱ्याअर्थाने गरज आहे असे प्रतिपादन इतिहासाचे आभ्यासक व सुप्रसिद्ध व्याख्याते विक्रम कदम यांनी केले.
सुपे (ता. बारामती ) येथील जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयात स्वराज्य संकल्पक श्री शहाजीराजे भोसले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'स्वराज्य संकल्पक श्री शहाजीराजे भोसले' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री शहाजीराजे भोसले, नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमापुजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ सुपा परगणा चे अध्यक्ष शहाजी चांदगुडे होते.
कदम म्हणाले की, स्वराज्याची आखिव रेखीव मांडणी करुन खरा ताळेबंद शहाजीराजे यांनी मांडला. शहाजीराजांनी स्वतः मधील सर्व गुणांचा वारसा छत्रपतींना दिल्यामुळे शिवराय घडले. त्यामुळेच शिवरायांनी स्वराज्याला सुराज्यात प्रत्यक्षात उतरवण्याचे काम केले.
नागरगावचे तुळापुर नाव झाले...
आदीलशाहीतील एक सरदार दुर्दर आजाराने त्रस्त होता. आजार काही केल्या बरा होत नव्हता. एक दिवस नागरगावात साधु कडुन औषधे घेतल्याने सरदाराचा रोग बरा झाला. हत्तीची तुळा करायची होती. त्यावेळी शहाजीराजांच्या कल्पक बुद्धीच्या जोरावर ही तुळा केली. या सरदाराने साधुला बक्षिस म्हणुन हत्तीच्या वजनाइतके सोने दिले. त्यानंतरच पुढे नागरगावचे नाव तुळापुर पडले.
स्वराज्याच्या आड येणारा अफझलखान असो कि कृष्णाजी भास्कर असो तो असाचा फाडला जाईल असा संदेश प्रतापगडाच्या पायथ्याला शिवरायांनी दिला. महाराजांची तलवार ही कोणाच्या धर्माच्या अथवा जातीच्या विरोधात नाही तर स्वराज्याच्या शत्रूच्या विरोधात चालत होती. एकदा शत्रूच्या स्त्री सोबत मेहुण्याने गैरकृत्य केले. शत्रूच्या स्त्रीचा सन्मान केला पाहिजे हा संदेश देताना स्वत:च्या मेहुण्याचे डोळे काढुन आंधाऱ्या कोठडीत आजन्म ठेवले हे संस्कार शहाजीराजांनी शिवरायांना दिले. असे अनेक दाखले सांगताना प्रत्यक्ष पुढे प्रसंग उभा राहील अशा स्पष्ट प्रभावी आवाजात कदम यांनी मार्गदर्शन केले.
जनमाणसांना संघटीत करुन शिवरायांच्या विचाराचा जागर महाराष्ट्राभर करण्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फार मोलाचा वाटा आहे. तर सुभाषचंद्र बोस यांना इंग्रजांनी ११ वेळा तुरुंगात डांबले. मात्र बोस यांनी शिवरायांचा वारसा पुढे नेत इंग्रजांना जेरीस आणले होते असेही कदम यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ सुपा परगण्याचे संस्थापक सुभाष चांदगुडे, बाजार समितीचे संचालक विशाल भोंडवे, कैलास जगताप, दत्तात्रय ठाकूर, सागर भांगे, संजय पोमण, हनुमंत चांदगुडे, लक्ष्मीकांत भोसले, नामदेव चांदगुडे, सुभाष काळखैरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जेष्ठ सदस्य अशोक बसाळे यांनी केले. तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे यांनी मानले.
................................