सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जुन्नर : प्रतिनिधी
वारूळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डावा कालव्यात उच्चशिक्षित दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
यापैकी चिराग शेळके याचा मृतदेह कालव्यातून काढण्यात बुधवारी यश आले, तर पल्लवी शेळके यांचा गुरुवारी (दि. २ ) मृतदेह मिळून आला. या दाम्पत्याने अंतर्गत वादातून आत्महत्या केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. या घटनेने नारायणगाव व वारुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिराग चंद्रशेखर शेळके (वय २८) व त्यांची पत्नी पल्लवी चिराग शेळके (२५, रा. वारुळवाडी अभंगवस्ती, ता. जुन्नर) हे सध्या पुण्यात वास्तव्यास होते. चिराग आणि पल्लवी यांचे १ एप्रिल २०२४ ला लग्न झाले होते. चिराग हा आयटी कंपनीत नोकरीला होता आणि पल्लवी एका नामवंत कॉलेजमध्ये शिक्षिका होत्या.
सुटीमुळे ते गावी आले होते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चिराग शेळके व त्यांची पत्नी पल्लवी शेळके हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डाव्या कालवा परिसरात आपल्या दुचाकीवरून आले. त्या दोघांनी गाडी कालव्याच्या बाजूला लावली. हे जोडपे चर्चा करत असताना अचानक कालव्याच्या वाहत्या पाण्यात त्यांनी उडी घेतली. त्यावेळी डिंभे कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडला होता. त्यामुळे ते दोघे पाण्यात वाहून गेले. याची माहिती फिरण्यासाठी आलेल्या काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. या घटनेची माहिती सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलिसांना दिली.