Bhor Breaking l संतोष म्हस्के l अजित पवार गटाच्या आमदाराने काढली हत्तीवरून मिरवणूक : वनविभागाकडून गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के 
भोर विधानसभेतील निवडणुकीचे यश साजरे करण्यासाठी पिरंगुटमध्ये हत्तीवरून काढलेली मिरवणूक आणि पेढे वाटप भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकत्यांना महागात पडले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.
             रविवारी रात्री उत्साही कार्यकर्त्यांनी पिरंगुट येथे आमदार मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी याबाबत अधिक माहिती घेतली. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत हत्तीला विशेष संरक्षण आहे. हत्तीच्या मिरवणुकीत सहभागावर अनेक निबंध आहेत. चौकशीअंती मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे यांनी सांगलीहून हत्ती आणल्याचे निष्पन्न झाले.आदित्य परांजपे यांनी सांगितले की, 'कोल्हापूर परिमंडळाच्या अतिरिक्त मुख्य वन्यजीव संरक्षकांनी, संयोजकांना, हत्तीच्या केवळ वाहतुकीसाठी परवानगी दिली होती. या पत्रामध्ये हत्तीचा मिरवणूक किंवा पालखी सोहळ्यासाठी वापर करता येणार नाही. गर्दी, गोंगाट असलेल्या ठिकाणी हत्ती नेऊ नये, त्याचा वावर असलेल्या भागात फटाके वाजवू नयेत, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. तरीही संयोजकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून हत्तीची मिरवणूक काढली. त्यामुळे संयोजक आणि संबंधित संस्थेवर वनाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.'
     वन विभागाने मिरवणुकीस परवानगी दिल्याचा दावा आयोजकांनी केला होता; पण तपासाअंती मिरवणुकीस परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत बलकवडे आणि देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे. हत्ती सध्या देवस्थानकडे असून तो ताब्यात घेण्यात येणार आहे,' अशी माहिती पौड वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.
To Top