सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन राज्य शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे यासाठी ॲग्रीस्टॅक योजना आणली गेली आहे.भोर तालुक्यात केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद असून तालुक्यात ९ हजार २१० शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक करून घेतले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले.
शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रियेस गतिमान करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. भोर तालुक्यात अॅग्रिस्टॅक योजनेचे कामकाज ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. त्याअनुषंगाने ग्राम महसुल अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक व महा ई सेवा केंद्रामध्ये सदरचे कामकाज सुरु आहे. तरी भोर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टंक योजने अंतर्गत आपला ७/१२ आधारला लिंक करावयाचा आहे.जेणेकरून शेतकऱ्याला एक फार्मर आयडी मिळेल. ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना याद्वारे घेता येईल. शेतकऱ्यांनी आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक व सर्व ७/१२ व ८ अ उतारे कागदपत्रासह ग्राम महसुल अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक व महा ई सेवा केंद्रावर जावून सदर योजनेचा लाभ घेवुन फार्मर आयडी तयार करावा असेही प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी सांगितले.