सोमेश्वर रिपोर्टर टीम------
डॉ. श्रीमंत कोकाटे-------
इंग्रजांच्या जुलमी जोखडातून भारताला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी आधुनिक काळातील पहिला सशस्त्र लढा उभारणारे उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादाजी खोमणे नाईक तर आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचे पूर्वज पुरंदर किल्ल्याचे रखवालदार होते. छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये नाईक परिवाराचे विशेषता रामोशी समाजाचे मोलाचे योगदान आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते. गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी रामोशी समाजाने सर्वस्व पणाला लावले.
उमाजी नाईक यांना आपल्या वाढवडिलांपासून दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे, भाला फेकणे, गोफण चालवणे, लढाई करणे, तोफगोळा फेकणे, गडकोट किल्ले चढणे, डोंगर दऱ्यातून घौडधोड करणे याचे शिक्षण मिळाले होते. बालपणापासूनच उमाजी नाईक हे छत्रपती शिवाजीराजांना आपले स्फूर्ती स्थान मानत असत. शिवरायांची प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. उमाजी नाईकांच्या बालपणी देशात मोठी घडामोडी झाली. इंग्रजांनी पेशवाईची सूत्रे ताब्यात घेऊन दुसऱ्या बाजीरावाला नामधारी पेशवा केले. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने पुरंदर किल्ल्याचे जे पारंपरिक अधिकार रामोशी नाईक यांच्याकडे होते ते काढून घेतले. त्यामुळे रामोशी समाज खवळला. त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध बंड केले. त्या बंडाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केले.
उमाजी नाईक हे स्वाभिमानी, निर्भीड, प्रामाणिक आणि लढवय्ये होते. कोणाचाही अन्याय सहन करायचा नाही आणि कोणावरही अन्याय करायचं नाही हे शिवरायांचे सूत्र त्यांनी आत्मसात केलेले होते. उमाजी नाईक गरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. इंग्रजांचा खजिना लुटायचा आणि गरिबांना वाटायचा, असे त्यांचे सूत्र होते. सावकार, वतनदार आणि इंग्रज यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले. आपल्या राज्यातील स्त्रियांचा आदर -सन्मान झाला पाहिजे, याची त्यांनी काटेकोर काळजी घेतली. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना त्यांनी शिक्षा केली. इंग्रजांच्या जुलमी कायद्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. छत्रपती शिवाजीराजांच्या पावलावर पाऊल ठेवून ते राज्यकारभार करत होते. त्यांना पकडण्यासाठी नेमलेला इंग्रज अधिकारी मॅकिन्टॉश म्हणतो की शिवाजी महाराज हे उमाजी नाईक यांचे आदर्श होते. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा उभारणारे उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक आहेत. त्यांना १८१८ मध्ये ब्रिटिशांनी पकडले. त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली. या एक वर्षाच्या काळात ते तुरुंगातच लेखन वाचन शिकले. त्यांची बुद्धिमत्ता कुशाग्र होती.
एक वर्षाच्या शिक्षेनंतर उमाजी नाईक इंग्रजांच्या कैदेतून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी पुणे, सातारा, सोलापूर, कोकण परिसरात संघटन उभारले. ते उत्तम संघटक होते. प्रजेवर ते जिवापाड प्रेम करत असत. मित्रांना अत्यंत आपुलकीने वागवत असत. त्यांचे ध्येय संपूर्ण स्वातंत्र्याचे होते. त्यासाठी त्यांनी खजिना गोळा केला. २२ जुलै १८२६ रोजी उमाजी नाईक यांना जेजुरी कडेपठार येथे राज्याभिषेक झाला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. कोकणात त्यांनी दौरा केला.
उमाजी नाईक यांनी जाहीरनामा प्रकाशित केला. त्यामध्ये त्यांनी प्रजेला आवाहन केले, की इंग्रजांना महसूल देऊ नका. इंग्रजांची नोकरी करू नका. ज्यांचे मान-सन्मान, पदव्या गेलेल्या आहेत त्यांना लवकरच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व सन्मान बहाल करण्यात येतील. अर्ध्या जगावर राज्य असणाऱ्या इंग्रजांना सह्याद्रीच्या या वीराने दिलेले आव्हान निश्चितच क्रांतिकारक होते. सह्याद्रीच्या सुपुत्रांनी नेहमीच जगातील जुलमी शक्तीविरुद्ध लढा दिलेला आहे. ही प्रेरणा जिजाऊ-शिवरायांनी या मातीत निर्माण केलेली आहे. ती पुढे छत्रपती संभाजीराजे, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, शाहूराजे आणि उमाजी नाईक यांनी कायम ठेवली.
उमाजी नाईकांना पकडण्यासाठी इंग्रजांनी जंग जंग पछाडले. सह्याद्री, कोकण, पुरंदर इत्यादी दऱ्याखोरी इंग्रजांनी पिंजून काढली, परंतु उमाजी नाईक इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. उमाजी नाईकांना पकडून देण्यासाठी इंग्रजांनी मोठे बक्षीस जाहीर केले. बक्षिसाची रक्कम वाढवत वाढवत ती दहा हजार रुपये आणि ४०० बीघे जमीन (२०० एकर जमीन) देण्याचे इंग्रजांनी जाहीर केले. इंग्रज अधिकारी कॅप्टन डेव्हीस, कॅप्टन मॅकिन्टॉश आणि बॉईड यांनी सह्याद्री पिंजून काढला. परंतु उमाजी नाईक त्यांच्या हाती लागले नाहीत.
उमाजी नाईक भोर तालुक्यातील उतरोली या गावी असताना फितुरीने घात केला. त्यांना १५ डिसेंबर १८३१ रोजी पकडण्यात आले. पुण्यातील खडकमाळ येथे त्यांना अंधार कोठडीत ठेवण्यात आले. त्यांच्यावर खटला चालला. पकडणारे, खटला दाखल करणारे आणि न्याय देणारे सर्व इंग्रज होते, त्यामुळे त्यांना न्याय मिळणे शक्य नव्हते. न्यायाधीश जेम्स टेलर याने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आले. त्यावेळेस त्यांचे वय फक्त ४१ वर्षाचे होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढाऊ उभारणारे व फाशी जाणारे उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक आहेत. अशा आद्य क्रांतिकारकाला स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!