सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पुरंदर तालुक्यातील बोपगावचे सुपुत्र व सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सातारा येथे कार्यरत असणारे कृष्णा फडतरे यांना जाहीर झाला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे या संस्थेमार्फत दरवर्षी राज्यातील पूर्वप्राथमिक, प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षकांचे तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नवोपक्रमाविषयी स्पर्धांचे आयोजन करत असते.सदर स्पर्धेचे मूल्यांकन जिल्हा,विभागीय व राज्य पातळीवर होते.
या स्पर्धेत कृष्णा फडतरे यांनी सादर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व कोडींग कौशल्य विकसनातून शिक्षक सक्षमीकरण उपक्रमाची दखल घेत राज्यातील शिक्षण विभागाच्या अधिकारी गटातून फडतरे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
कृष्णा फडतरे यांनी या उपक्रमातून सातारा जिल्ह्यातील दोन हजार शिक्षकांना कोडींग प्रशिक्षण दिले. एक हजार कोडींगवर आधारित व्हिडिओ व स्क्रॅच प्रोजेक्ट तयार केले आहेत. उत्कृष्ट ५० शिक्षकांना विविध संस्थांच्या मदतीने १० संगणक असणाऱ्या ५० लॅब ,५ टॅब व लॅपटॉप अशी ६० ते ७० लाखांची मदत शिक्षकांना मिळवून दिली.
सदर नवोपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये डिजिटल साक्षरता,आधुनिक तंत्रज्ञानाचा शाळांमधे उपयोग,कोडींग व संगणकीय मूलभूत कौशल्य शिक्षकांमध्ये विकसित होण्यासाठी मदत झाली.या नवोपक्रमामुळे नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट होणारे कोडींग या विषयावर अभ्यासक्रम येण्यापूर्वीच अनेक शिक्षक प्रशिक्षित केले.
नवोपक्रमाचे मूल्यांकन वर्धा जिल्ह्याचे डायटचे प्राचार्य डॉ.मंगेश घोगरे , यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या प्रा.डॉ.संजीवनी महाले, टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. माधुरी इसावे यांनी केले.
पुरस्काराचे वितरण संचालक राहुल रेखावार, सहसंचालक अनुराधा ओक,उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे व माधुरी सावरकर आदी मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थित संपन्न झाला.