Sakhar parishad l जागतिक साखर उद्योगासाठी दुबई साखर परिषद दिशादर्शक : हर्षवर्धन पाटील

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
जागतिक अर्थकारणात साखर उद्योग हा एक महत्वपूर्ण उद्योग मानला जात असून सध्या प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जागतिक साखर उद्योगापुढील संभाव्य समस्यांवर सखोल उहापोह, विविध अडचणी व त्याचे निराकरण या परिषदेत केले जाणार आहे. त्यावर सर्वसमावेशक सामूहिक विचारमंथन देखील होणार आहे. त्यामुळे दुबई साखर परिषद ही जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक व नवसंजीवनी देणारी ठरणार आहे, असे प्रतिपादन भारताच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी  केले.
 दुबई येथे सोमवार दि.१० ते गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जागतिक साखर उद्योगाची नववी  दुबई साखर परिषद सुरू झाली असून या परिषदेत ७० देशातील साखर उद्योगातील प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. या दुबई साखर परिषदेमध्ये भारताच्या सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अंकिता पाटील ठाकरे, विधीज्ञ निहार ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच भारत सरकारचे सचिव दर्जाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. 
 हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, दुबई शुगर परिषदेमध्ये डिजिटल शेती, ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार व वापर, शाश्वत पाणी, पाण्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक संकल्पना, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी भांडवल जमवणे, साखरेच्या आरोग्यासंदर्भातील चुकीच्या अफवा, तापमान वाढीची चिंता या संदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. जागतिक तापमान हे १ अंश पेक्षा अधिक सेल्सिअसने वाढलेले असून सन २०२४  हे वर्ष उच्चांकी उष्णतेचे ठरले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार जागतिक तापमान वाढ होत राहणार आहे. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी देखील विचारमंथन होणार आहे. तसेच येवू घातलेली संभाव्य मंदी, वातावरणातील बदल, डॉलरची ताकद आदी संदर्भात देखील उहापोह  या परिषदेत होईल.
जगामध्ये प्रगत अर्थ व्यवस्थांमधील आर्थिक आणि वित्तीय धोरणे जगाला मंदीकडे आणि दीर्घकाळापर्यंत स्तब्धतेकडे ढकलण्याचा धोका आहे, अशी सर्वत्र चर्चा  आहे. त्यामुळे २००८ मधील आर्थिक संकट आणि २०२० मधील कोविड-१९ पेक्षा साखर उद्योगाचे अधिकचे नुकसान होऊ नये म्हणून सतर्कता बाळगणे संदर्भात देखील सविस्तर चर्चा या परिषदेत होईल. साखर उद्योगातील तंत्रज्ञान, आधुनिकता, साखर व्यापार, साखर उद्योगा पुढील आव्हाने या संदर्भात जगातील साखर उद्योगातील तज्ञ या परिषदेत आपले अभ्यासपूर्ण विचार मांडणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
----------------------------
दुबई साखर परिषदेमध्ये भारता साठी आपण पुढे काय पाहणार आहोत?' या विषयावरील चर्चासत्रात भारताच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व मान्यवर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारताचे साखर निर्यात धोरण, भारतामध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, शाश्वत ऊस विकास धोरण या संदर्भात देखील  हर्षवर्धन पाटील हे भारताचे प्रतिनधीत्व करत आपली मते मांडणार आहेत.

To Top