सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ता. बारामती येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून झालेल्या कामांमध्ये अनियमितता झाल्याने एक बांधकाम उपअभियंता नुकतेच निलंबित झाले आहेत. असे असताना आता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वाघळवाडी गावात पूर्ण झालेल्या एका गटर योजनेची कागदपत्रेच ग्रामपंचायत दफ्तरी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
याबाबत पुन्हा जिल्हा परिषदेकडे तक्रारी झाल्या आहेत. सन २०२०-२१ या कालावधीत वाघळवाडी ग्रामपंचायतीत बांधकाम विभागाकडून झालेल्या चार रस्त्यांच्या कामाबाबत तक्रारी झाल्या होत्या. यामध्ये विविध अनियमितता आढळल्याने उपअभियंता अक्षय झारगड काही दिवसांपूर्वीच निलंबत झाले आहेत. असे असताना आता पुन्हा पाणीपुरवठा विभागाच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. चेतनकुमार किसन सकुंडे यांनी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नीरा बारामती रस्ता ते महेश सावंत घर आणि नीरा बारामती रस्ता ते सोमनाथ फडतरे घर अशा दोन भूमीगत गटारांच्या योजनांची माहिती मिळविली आणि त्याआधारे पाणीपुरवठा उपअभियंता बारामती पंचायत समिती यांच्याकडे तक्रार केली. दोन्ही कामे एकाच ठिकाणी झाल्याचा संशय आल्याने नीरा बारामती रस्ता ते सोमनाथ फडतरे घर या भूमिगत गटराचे कामच झाले नसतानाही ठेकेदारास बिल अदा केले असल्याची ही तक्रार होती. याबाबत पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतीस नोटीस बजावत माहिती मागविली. यामध्ये ग्रामपंचायतीने नीरा बारामती रस्ता ते महेश सावंत घर या भूमिगत गटर योजनेचे इस्टिमेट, एम.बी. व मूल्यांकन दाखला आधी कागद उपलब्ध करून दिले. मात्र नीरा बारामती रस्ता ते सोमनाथ फडतरे घर या भूमिगत गटर योजनेचे इस्टिमेट दिले मात्र मूल्यांकन, एम.बी. ग्रामपंचायत दफ्तरी आढळून आली नसल्याचा खुलासा केला. सकुंडे म्हणाले, मागील पंचवार्षिक कालावधीतील कामाचे दफ्तरच गायब असल्याने उपअभियंता यांच्याकडे तक्रार केली होती. तिथे चौकशी न झाल्याने कार्यकारी अभियंता यांना तक्रार केली आहे. तिथेही न्याय न मिळाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे. विद्यमान सरपंच हेमंत गायकवाड म्हणाले, ग्रामपंचायत दफ्तरी जी कागदपत्रे उपलब्ध होती ती पाणीपुरवठा विभागास सादर केली आहेत.