पुरंदर l सासवड आगाराच्या नादुरुस्त बसमुळे शैक्षणिक सहलीचा बट्ट्याबोळ : महाबळेश्वरच्या घाटात एसटी बंद पडल्यामुळे भर उन्हात मुल पाच तास ताटकळली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
शिवरी (ता.पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षाणिक सहल २५ फेब्रुवारी रोजी वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड येथे गेली होती. सहलीसाठी सासवड आगाराने सीएनजीची लाल परी एसटी उपलब्ध करुन दिली होती. मात्र सकाळी ७.४५ ते १०.०० वाजेपर्यंत म्हणजे २ तास १५ मि. सदर एसटी वाई येथे बंद पडली. वाई बसस्थानकातून दुसऱ्या बसची मागणी केली मात्र  दुसरी एसटी मिळण्याऐवजी सदर एसटी बस तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त करुन देण्यात आली. याच एसटीने पुढील प्रवास सुरु झाला. प्रतापगडवरुन महाबळेश्वरकडून परतीच्या मार्गावर आंबेनळी घाटात अवघड वळणावर चढणीला दु.३ वा. ही एसटी पुन्हा बंद पडली.
           इ.२ री ते ४ थी च्या ६० विद्यार्थ्यांना भर दुपारी कडक उन्हात जीवमुठीत धरुन ताटकळत उभे राहावे लागले. घाटात मोबाईलला रेंज नव्हती. त्यामुळे वरिष्ठ व लोकप्रतिनिधींशी संपर्क होत नव्हता. सुमारे अडीच तास घाटात अवघड वळणावर भर उन्हात सर्व विद्यार्थी व शिक्षक उभे राहिल्यानंतर सुदैवाने सायं.५.२३ वा. महाबळेश्वरला नियमित जाणारी प्रवासी एसटी मिळाली. सर्व मुले व शिक्षक प्रवासी एसटीमध्ये गर्दीने उभी राहून १३८६ रुपये तिकिट काढून महाबळेश्वरला पोहोचले. 
          तोपर्यंत नादुरुस्त एसटी दुरुस्त करण्यासाठी महाबळेश्वर आगारातून बस दुरुस्ती करणारे कामगार सदर ठिकाणी गेले. सायं ७ वा.पर्यंत महाबळेश्वर आगारात नादुरुस्त एसटी आणली. सदर ना दुरुस्त एसटीच घेवून जाण्यासाठी महाबळेश्वर आगारातून आग्रह होता. मात्र पुन्हा रात्रीची जर बस बंद पडली तर याचा विचार करून शिक्षकांनी विनंती केल्यावर रात्री ८ वा. महाबळेश्वर आगारातून दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली. 
        सासवड आगाराच्या नादुरुस्त बसमुळे शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप, हाल सहन करावा लागला. रात्री ८ वा. गाडी उपलब्ध झाल्यामुळे सहलीची महाबळेश्वर, पाचगणी येथील ठिकाणांना भेट देता आली नाही. सकाळी वाई येथे अडीच तास, दुपारी आंबेनळी घाटात ५ तास वेळ गेल्याने सहलीसाठी भरलेले १५ हजार परत मिळावेत अशी मागणी मुख्याध्यापकांनी सासवडच्या आगारप्रमुखांकडे केली आहे. 
----------------------
विद्यार्थ्यांच्या एक दिवसीय सहलीचे नियोजित अंतर सुमारे अडीचशे ते तीनशे किमी असते. सहल एक दोन महिने पूर्वनियोजित असते. त्यामुळे यापुढे सासवड आगारातून लांब पल्ल्याच्या सहलीसाठी सुस्थितीतील एसटी असल्याची खातरजमा करुनच द्याव्यात. अशी अपेक्षा पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर व शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी केली.
To Top