सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जी मुलं फडात ऊस तोडत असतात, मोळ्या बांधत असतात, वाढे विकतात.. अशी ऊस तोड मजुरांची मुलं शनिवारी (ता. 29) रात्री चक्क स्टेजवर थिरकत होती. सोमेश्वर सहकारी साखर8 कारखान्यावर ऊस तोडणाऱ्या मजूरांच्या मुलांचा सांस्कृतिक महोत्सव पार पडला. दोनशे मुलांनी नृत्य, गाणी, ड्रामा, लोकगीते अशी पेशकश सादर केली आणि चेअरमन, एमडी यांच्यासह परिसरातील बागायतदारांनीही कौतुक केले. राज्यातील हा आगळावेगळा प्रयोग ठरत आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या वतीने ऊसतोड मजुरांच्या स्थलांतरीत मुलांच्या शिक्षणासाठी कोपीवरची शाळा हा राज्यातला आगळावेगळा अभ्यासवर्ग चालविला जातो. या अभ्यासवर्गामार्फतच चार महिने शिक्षण दिले गेले आणि मुले गावाकडे परतण्याआधी त्यांना कला सादर करण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव भरविण्यात आला. यामध्ये मुलांसोबत पालकांनीही नृत्याचा आनंद घेतला. दोनशेपेक्षा अधिक मुलांनी आपापल्या कला यामध्ये सादर केल्या आणि हजारभर ऊसतोड मजुरांनी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कलेला।दाद दिली. कारखान्याने मुलांना अत्यंत देखणे स्टेज, साउंड, लायटिंग उभारून दिले होते.
महोत्सवाचे उद्घाटन सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी इब्जा संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर, संचालक शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, ऋषिकेश गायकवाड, सरपंच हेमंत गायकवाड, अनिल चाचर, गीतांजली बालगुडे, युवराज खोमणे उपस्थित होते.
गणेश वंदना करून कार्यक्रमास सुरवात झाली. यानंतर लता मंगेशकर यांच्या जुन्या गाण्यांवरील नृत्याना तसेच बालविवाह व ऊसतोड करणाऱ्या मुलांवरील संगीतमय नाटिकेसही पसंती मिळाली. मजुरांच्या मुलांनी माझ्या शिवबा रं या छत्रपती शिवरायांवर व नांदणं नांदणं बाई हे डॉ. बाबासाहेब व रमाबाई यांच्यावरील आधारित सादर केलेल्या गीतांनी उपस्थित श्रोते भारावले.
संत ज्ञानेश्वरांपासून ते शेख महंमद ते गाडगेबाबा अशा अनेक संतांच्या वेशभूषा करून संतांच्या समतेचा, सलोख्याचा संदेश ऊसतोड मजुरांच्या मुलांनी दिला.
भलरी गड्या, येळकोट येळकोट जय मल्हार, तू ये ना, ऊस तोडायला चला आशा गाण्यांवर स्टेजवरील मुलांसह अक्षरशः खाली बसलेले पालकही थिरकले. शिक्षणाचे महत्व पटवणाऱ्या गाण्यांनी आणि सहा महिने ऊसतोडी या गाण्याने डोळे पाणावलेदेखील. विनोदी नृत्यकलेने भरपूर हसवलेदेखील.
संतोष होनमाने, आरती गवळी, नीतीन मोरे, अश्विनी लोखंडे, शुभम गावडे, अनिता ओव्हाळ, विकास पवार, विकास देवडे, अक्षय इथापे, सागर शिंदे, अस्मिता कांबळे ,कार्तिक लोखंडे, रोहित नगरे यांनी संयोजन केले.
प्रकल्प समन्वयक संतोष शेंडकर यांनी प्रास्ताविक केले बाबुलाल पडवळ व नौशाद बागवान यांनी सूत्रसंचालन केले तर संभाजी खोमणे यांनी आभार मानले.
सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने ऊसतोड मजुरांच्या बनवलेल्या मुलांनी लिहिलेल्या तयार केलेल्या विविध वस्तूंचे व साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते यामध्ये ऊसतोड मजुरांची मुलांनी लिहिलेले निबंध, लेख, यासह त्यांची चित्रे रांगोळ्या हस्तकलेच्या वस्तू उसापासून तयार केलेल्या बैलगाड्या मुलांनी लिहिलेले पेपर याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळांनी याचे कौतुक केले
-