सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुका हा शेतीच्या बाबतीत प्रगतशील समजला जातो. परंतु याच तालुक्याच्या पश्चिम भागात गुंडगिरी वाढत असल्याचे दिसत आहे.
जो-तो उठतोय मी भाई आहे, काहीजण म्हणतात मी डॉन आहे. अगदी ओठावरती मिसरुट न फुटलेले पोरं या भाईगिरी मध्ये उतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यांना कुणाचा आशीर्वाद आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. आज कोणाला मारायचे.... हॉकी स्टिक घेऊन ये.... आज त्याचा कार्यक्रम करू.... अशी बोलण्याची भाषा यामुळे काही भागात भीतीचे वातावरण आहे. आपली गॅंग लय मोठी आहे... कुणाचा बाप आडवा येतो.. तेच बघतो. अशी उद्धटपणाची भाषा या गावगुंडांकडून वापरली जाते. त्यामुळे कुणीही पुढे येण्यास धजावत नाही. वास्तविक पाहता, शांत असलेल्या वातावरणामध्ये अशी टवाळखोर पोर हे वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पोलिसांनी अशांना वेळीच आवरणे गरजेचे आहे. दुचाकी वर बसणे, दुचाकी सुसाट वेगाने पळवणे, हॉर्नचा कर्कश आवाज अशा गोष्टी नित्याच्याच बाबी बनल्या आहेत. त्यामुळे यासंबंधी तक्रार करण्यास पुढे कोणी येत नाही. अनेक भाईगिरी करणारे रात्रीच्या १ वाजेपर्यंत फिरत असतात. कानाला सतत मोबाईल असतो. त्यामुळे हे तरुण नक्की काय करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. या टुकार तरुणांना कुणाचा आश्रय किंवा अभय आहे हे सुद्धा तपासणी गरजेचे आहे. तरुणांच्या दोन गटांमध्ये होणारी भांडणे किंवा राडा या गोष्टी तर, जणू काही दिवसाढ घडत असल्याचे दिसत आहे. पोलीस प्रशासनाने या कामी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा जसे शहरांमध्ये टोळी युद्ध भडकते, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा याची प्रचिती होऊ शकते. गुंडगिरी करणाऱ्या पिलावळींना वेळीच ठेचून काढले पाहिजे. मराठी मध्ये एक म्हण आहे..... दुःख नाही.... परंतु काळ सोसावला नाही पाहिजे.