सोमेश्वर रिपोर्टर टीम------
संतोष माने
पुणे-अहिल्यानगर-सोलापूर या जिल्ह्याला वरदायिनी ठरलेले उजनी धरण 25 टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे.
सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उजनीतून पाणी सोडले जात आहे. मात्र उजनीच्या पाणलोट लगतचा शेतकरी अर्थात इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. उजनी धरणाच्या निर्मिती वेळी आम्ही जमिनी देऊन भूमिहीन झालो. मात्र आमच्या हक्काचे पाणी आरक्षित न करता सर्व पाणी पिण्याच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्याला सोडले जात आहे. असा आरोप सुद्धा अनेकांनी केला. उजनी धरण हे तत्कालीन मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात झाले. त्यामुळे उजनी धरणाला यशवंत सागर असे संबोधले जाते. उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात बोगदा असो किंवा भीमा नदी पात्र यातून पाणी सोडले जात आहे. दि. ३१ मार्च सकाळी सहा वाजता उजनी धरण हे २५.९४ टक्के होते. उजनीच्या पाणी वाटपाचे सम नियोजन करणे काळाची गरज आहे. वारंवार इंदापूर तालुक्यातील शेतकरी किंवा पाणलोट क्षेत्रालगतचे ग्रामस्थ समान न्याय वाटपानुसार पाण्याची विभागणी करावी अशी मागणी करत आहे. परंतु शासकीय पातळीवर याबाबत कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे धरण उशाला.... कोरड घशाला.... अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. दररोज पाणी पातळी घटत असल्याने शेतकऱ्यांना आपली विद्युत पंप पुढे सरकावे लागत आहेत. उजनी धरणा वरती इंदापूर तालुक्यातील बिल्ड कागद प्रकल्प, बारामती औद्योगिक वसाहत, बारामती नगरपालिका यांसह अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. वास्तविक पाहता सोलापूर शहराला अर्थात महानगरपालिकेला पिण्यासाठी जलवाहिनीतून पाणी नेणे गरजेचे आहे. आम्हाला समजलेल्या माहितीनुसार जलवाहिनीचे काम काही प्रमाणात राहिले असल्याची माहिती मिळते. जलवाहिनीद्वारे पाणी नेल्यास पाण्याचा अपव्यय टाळता येईल. त्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडताना इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विचार करावा अशी आर्थ मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.