सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील कण्हेरी येथे शेजारील शेतामध्ये लागलेली आग आपल्या सीताफळाच्या बागेत येऊ नये म्हणून आग विझवण्यासाठी प्रयत्न करणारे शेतकरी व माजी सरपंच संपत पाटणे आगीमध्ये होरपळून जखमी झाले होते. पुणे या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कण्हेरी या ठिकाणी संपत पाटणे त्यांची सीताफळाची बाग आहे. शेजारी असणाऱ्या शेतामध्ये शुक्रवारी दुपारी आग लागल्याने ही आग आपल्या बागेकडे येऊ नये यासाठी संपत पाटणे हे आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, आग विझवण्याच्या नादात करवंदाच्या जाळीत ते अडकले व जाळीने पेट घेतल्याने त्यांनी आरडाओरडा केला मात्र यावेळी आसपास कोणीही नसल्याने त्यांना लवकर मदत मिळू शकली नाही. या ठिकाणी काही महिलांना ही घटना दिसल्यानंतर त्यांनी पाटणे यांच्या घरच्यांना याबाबतची माहिती तातडीने दिली. यानंतर घरच्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. पुणे येथील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.