सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : महेश जगताप
मुर्टी (ता. बारामती) या जिराईत भागातील सुजीत रघुनाथ जगदाळे यांनी वेळोवेळी गुणवत्ता सिध्द केली असून आताही थेट अमृतसरच्या 'आयआयएम' (भारतीय प्रबंधक संस्थान) या केंद्रसरकारच्या अखत्यारितील नामांकित संस्थेत डीन (अधिष्ठाता) म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. बाभळीखाली भरणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत शिकून या पदापर्यंत गेल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
मुर्टी हा बारामती तालुक्यातील सततचा दुष्काळी भाग. शिक्षण घेऊन नोकऱ्यांमध्ये संधी शोधणे याशिवाय फारसे अन्य मार्ग नाहीत. त्यामुळे या भागातून शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, सेनादल अशा सेवांमध्ये अनेकजण पोचले आहेत. सुजित जगदाळे हे पहिले व्यक्ती आयआयएम पर्यंत पोचले असून आता डीन झाले आहेत. जगदाळे हे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे तर कलिंगा युनिव्हर्सिटी ओरिसा येथे रूरल मॅनेजमेंटमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. दुग्धाक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरिअन यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण प्रबंधक संस्थेत त्यांनी पीएचडी केली. यामुळे आयआयएममध्ये जाऊन ग्रामीण भागातील गरिबी आणि व्यवस्थापन या विषयावर ते सातत्याने संशोधन करत आहेत.
जगदाळे म्हणाले, आयआयटी, आयआयएममध्ये मराठी टक्का कमी आहे. वास्तविक तिथे जाऊन शेतकरी, गरीब घटक यांच्यासाठी सकारात्मक गोष्टी करता येतात. आजोबा दुसऱ्याच्या शेतात राबायचे. त्यांची प्रेरणा घेऊन सध्या शेतकऱ्यांचे विषय अभ्यासासाठी घेतो. आईवडील, जेवण नसलं तरी चालेल पुस्तकं घ्या आणि द्या असं सांगतात म्हणून इथपर्यंत पोचलो.
----------------------
सुजीत जगदाळे यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांच्या गवत अथवा गव्हाचे काड जाळण्यासंदर्भात नुकतेच महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. संशोधनातून काड जाळल्याने प्रदूषण होत असल्याबद्दल शेतकऱ्यांना पूर्णतः जबाबदार ठरविणे अयोग्य असल्याची मांडणी केली. बाजारपेठ आणि सरकारी धोरण जबाबदार असून धोरणे शेतकरीपूरक हवीत हे संशोधनातून सिद्ध केले. उपायही सुचविले. या संशोधनाची देशपातळीवर दखल घेतली गेली. तसेच बुंदेलखंड या मागास भागातही त्यांनी शेतकऱ्यांसोबत काम केले आहे. अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड ब्राझील, फीनलंड, जर्मनी, ऑस्ट्रीया आदी देशातील विद्यापीठामध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत. तसेच जगातील नामांकित नियतकालिकांमध्ये संशोधन प्रसिध्द झाले आहे.
---