सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड किल्ल्यावर संरक्षित क्षेत्रात अनधिकृतरित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाच्या हस्तक्षेपाने पुतळा हटविण्यात आला.
राजगड किल्ला (ता. राजगड) संरक्षित क्षेत्राच्या हद्दीत अनाधिकृत चौथाराचे बांधकाम करून त्यावर मेघडंबरी (छत्री) बसवून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनाधिकृत बसवल्या प्रकरणी हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेचे रवींद्र दिलीप पडवळ रा. वडकी (ता. हवेली) यांच्यासह इतर 25 ते 30 अज्ञान सदस्यांच्या विरुद्ध वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली आहे.
संबंधित घटना शनिवारी (ता. २६) रात्री साडेनऊ ते रविवारी (ता.२७) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
--------------
"राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे स्मारक व्हावे ही आमचीही भावना आहे. शिवप्रेमींची भावना शुद्ध आहे. मान्य आहे की नियम आणि कायद्यांचे पालन आवश्यक आहे. परंतु शिवप्रेमींनी महाराजांवरील प्रेमापोटी मेघडंबरी उभारली आहे म्हणून शिवप्रेमींना 'गुन्हेगार' ठरवणे हे अन्यायकारक आहे.
संतोष दसवडकर ,अध्यक्ष मनसे पुणे जिल्हा
----------------------
पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे
राजगडसारख्या ऐतिहासिक आणि संरक्षित किल्ल्यावरील मूळ वास्तुशैली व ऐतिहासिकता कायम ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही बांधकाम किंवा नविन स्थापनेची परवानगी पूर्वमंजुरीशिवाय देऊ शकत नाही. प्राचीन स्मारक संरक्षण कायद्याचे पालन सर्वांनाच बंधनकारक आहे.
------------------------
शिवप्रेमींची बाजूही तेवढीच भावनिक आहे :
राजगड म्हणजे फक्त एक किल्ला नाही, तर हिंदवी स्वराज्याचा पहिला साक्षीदार आहे. राजगड हे शिवरायांचे स्वप्न साकारलेले स्थान आहे. या ऐतिहासिक भूमीवर महाराजांचे काहीतरी कायमस्वरूपी गौरवचिन्ह उभे राहावे, ही शिवप्रेमींची इच्छा आहे. जर नियम तोडणं गुन्हा असेल तर मग...अनेक किल्ल्यांवर जेथे बेकायदेशीर बांधकामे आहेत त्या सर्व ठिकाणीही तितक्याच तत्परतेने कारवाई व्हायला हवी!