खेळाडूंसाठी गुड न्युज ! सोमेश्वरनगर येथील क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा : १ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचा सततचा पाठपुरावा आणि क्रीडा विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने बारामती तालुका क्रीडा संकुलाच्या धर्तीवर सोमेश्वरनगर परिसरात क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. 
          अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या क्रीडा संकुलाला क्रीडा विभागाने ३१ मार्चला प्रशासकीय मान्यता दिल्याने येथील क्रीडा संकुल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत क्रीडा प्रेमींनी आनंद व्यक्त केला असून हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सन २०१८ पासून इंजिनिअरिंग महाविद्यालयाने या ठिकाणी क्रीडा संकुल व्हावे, यासाठी प्रस्ताव पाठविला होता. संबंधित प्रस्ताव मंजूर होऊन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी महाविद्यालय परिसराची पाहणी करत क्रीडा संकुल मंजूर करण्यासंदर्भातील सर्व बाबी पूर्ण केल्या होत्या. बंदिस्त पेक्षागृह बांधण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर १८० बाय १०० मीटर मैदान आणि धावपट्टी तयार करण्यासाठी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २५ टक्के रक्कम सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाला भरावी लागणार आहे.
                 सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. सोमेश्वरनगर परिसरात जवळपास १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खेळाडूंना वेगवेगळ्या खेळासाठी मैदान नसल्याने सध्या मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या मैदानावरच सराव करावा लागत होता. सोमेश्वर परिसरातून गेल्या तीन वर्षात शेकडो विद्यार्थी पोलिस दलात दाखल झाले आहेत. क्रीडा संकुल होणार असल्याने यामध्ये वाढ होऊन अनेक खेळाडूंना करिअर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सोमेश्वरनगर परिसरात मु. सा. काकडे महाविद्यालय, सह्याद्री महाविद्यालय, सोमेश्वर इंजिनियरिंग महाविद्यालय, सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठान तसेच विविध अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्रीडा संकुल होणार असल्याने या खेळाडूंना सरावासाठी मोठी मदत होणार आहे.
........
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ क्रीडा संकुलासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, तत्कालीन क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महेश चावले यांच्या मदतीने क्रीडा संकुलाचे स्वप्न साकार होत आहे. यामुळे सोमेश्वरच्या वैभवात भर पडणार आहे. या माध्यमातून अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात नावारूपाला येथील अशी माहिती सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व सचिव भारत खोमणे यांनी दिली.
To Top