सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : मनोहर तावरे
पुणे जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग म्हणून अष्टविनायकातील 'मोरगाव' येथे दि. २१ रोजी लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलय. यानिमित्त सोमवारी शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग होणार आहे. मोरगाव मंडळ विभागातील ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील सुसंवाद वाढावा तसेच नागरिकांची कामे सुलभ व्हावीत या हेतूने माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या पुढाकारातून शासन स्तरावर हा कार्यक्रम सुरू आहे. शासनाच्या विविध विभागातील नागरिकांची प्रलंबित असलेली कामे व प्रश्न याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात येईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार श्री गणेश शिंदे यांनी केले आहे.
बारामती उपविभागीय अधिकारी माननीय वैभव नावडकर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे मोरगाव ग्रामपंचायत येथे आयोजन करण्यात आलय. यावेळी महसूल , भूमी अभिलेख , कृषी विभाग , पंचायत समिती , महिला व बालकल्याण विभाग यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बारामती येथे सरकारी कार्यालयात होणारा कामाचा विलंब व या अनुषंगाने असणाऱ्या विविध तक्रारी सोडवण्यासाठी 'शासन आपल्या दारी या धर्तीवर ही संकल्पना आहे. नागरिक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यातील सुसंवाद वाढून सर्व शासकीय यंत्रणा व त्यांच्या कामकाजाची नागरिकांना माहिती हवी हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे.
मोरगाव सह परिसरातील सुमारे आठ ते दहा गावांना या कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. मोरगाव मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांनी यासाठी सकाळी 11 वाजता मोरगाव येथे उपस्थित असणे आवश्यक आहे. गेली अनेक वर्षानंतर प्रथमच हा कार्यक्रम होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा सर्वाधिक फायदा होईल.