सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोरेगाव : प्रतिनिधी
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेवटचे टोक असलेल्या सर्कलवाडी येथे गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी मध्यरात्री सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास एका हृदयद्रावक घटनेत मद्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या मारुती अल्टो कारखाली चिरडून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
रमेश लक्ष्मण संकपाळ असे दुर्घटनेत बळी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ग्रामदेवता श्री जानुबाई देवी यात्रा छबिन्याचा कार्यक्रम आटपून आपल्या घराच्या ओट्यावर झोपले असताना हा अपघात घडला. अपघातानंतर गावात तणावपूर्ण वातावरण असून ग्रामस्थांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेरीस शुक्रवारी सकाळी आठ वाजता राजे याच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून आणि वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, भुईंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर राजे हा मध्यरात्री भुईंज येथून आपल्या गावी वाघोली तालुका कोरेगाव येथे भरधाव वेगात अल्टो कार घेऊन निघाला होता. मध्यरात्री सुमारे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास त्याचे कारच्या स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रमेश सपकाळ यांच्या घराच्या ओट्यावर चढली. या कारखाने चिरडले गेल्याने रमेश संकपाळ यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच सर्कलवाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी सर्कलवाडी ग्रामस्थांनी वाठार पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. ऋतुराज कृष्णात संकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक ज्ञानेश्वर बाबुराव राजे या भुईंज पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सर्कलवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाठार स्टेशन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आरोपी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.रमेश सपकाळ यांच्या आकस्मिक निधनामुळे संकपाळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हवालदार उदयसिंग जाधव तपास करत आहेत.
-----------
ग्रामस्थ आक्रमक; रास्ता रोको आंदोलन करण्याच्या पावित्र्यात
सर्कलवाडी येथे निष्पाप रमेश संकपाळ यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले ज्ञानेश्वर राजे हे वाघोली येथील रहिवासी असून पोलीस दलात कार्यरत असल्याने त्यांना या अपघातातून वाचवण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली असून त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालय आणि सर्कलवाडी येथे ग्रामस्थ संतप्त अवस्थेत असून त्यांनी वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एकूणच वाठार स्टेशन पोलीस ठाणे या गुन्ह्यात कायद्याप्रमाणेच काम करणार आहे कोणालाही सहकार्य होणार नाही अशी ग्वाही पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्कलवाडी ग्रामस्थांना दिली आहे.