सोमेश्वर रिपोर्टर टीम------
चार आण्यात अख्खी मुंबई मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया, दिल्लीचा कुतुब मिनार, हैदराबादचा चारमिनार पाहायला मिळायचा,दिलीपकुमार पासून अमिताभ बच्चन ,हेमा मालिनी,राजेश खन्ना पासून नूतन पर्यंत नट नट्या दाखवायचा ..त्यावेळी जत्रेत हमखास एक मोठा डबा वाला माणूस यायचा व त्या डब्याला छिद्र असायचे ..डब्याच्या पाठीमागून तो माणूस त्या काळातील ब्लँक अँड व्हाईट म्हणजेच रंगीत नसलेले फोटो टाकतं व आम्हाला मुंबई , दिल्ली सह देशात फिरवून आणायचा ... दहा पैशात लाल गारेगार कांडी .. चार आण्यात दुधी गारेगार मिळायचे ज्याने आख्खा उन्हाळा आमचा गार व्हायचा आणि जत्रेतल्या तमाशातील वगनाट्य कडे आमचे पाय वळायचे... मंगला बनसोडे सारख्यांचा तमाशा म्हणजे गाण्यासह वगनाट्य ची मेजवानी असायची.. वगनाट्याच्या शेवटी खूप मोठा सार /शिकवण आम्हाला मिळायची... दहा पैशात बारीक कलिंगड मिळायचे तर चाळीस पैशात भले मोठे कलिंगड मिळायचे.. अगदी चार-पाच मित्र आम्ही बसून त्याचा फडशा पाडायचो. .. दहा-पंधरा पैशात.. बुडी का बाल मिळायचा...ही मिठाई म्हणजे.. थोडासा रंग मिसळलेली केसाळ असल्यामुळे केसाळ असल्यामुळे की काय त्याला आजतागायत तेच नाव आम्हाला माहिती आहे.. लोणंद वरून एक भैय्या सायकलवर यायचा दहा पैशात अंगठी.. चार
आण्यात तो त्याच्या मिठाईपासून घड्याळ बनवून द्यायचा .. वेगवेगळे पक्षी तू त्या मिठाईतून करून द्यायचा.. मित्रांना घरातल्यांना हे दाखवले की नंतर ही मिठाई आपण खाऊन घ्यायची... परीक्षा संपून शाळेला सुट्ट्या लागलेले असायच्या.. त्यामुळे सुर पारंब्या, सुर फाट्या खेळून , कॅनॉल ला तास न तास पोहून, उन्हातानात विठी दांडू खेळून आलेला शिन या जत्रेत विसरून जात असत.रंगीत गोट्यांचे खेळ उन्हा तान्हात खेळलो तरी आम्हाला काळे पडायची अथवा आजारी पडायची भीती नव्हती भिती होती ती फक्त आई-वडिलांची आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांची.
खूप खर्चिक खेळण्याची आम्हाला गरज नसायची... शाळा शिकताना जुनी पुस्तक निम्म्या किमतीत घेतलेली वापरने,शिल्लक पानांचा वापर करून बाइंडिंग केलेल्या वह्या वापरणे, शाळेच्या खाकी चड्डीवर रफू करून छान केलेल्या ठिगळाची आम्हाला लाज वाटत नसे... जत्रेतील शेव रेवडी चा आनंद वेगळाच असायचा...संध्याकाळी कुस्त्या असायच्या..पैलवान नसला तरी कुस्ती खेळाला म्हणून त्याला गावातील ज्येष्ठ लोक पैसे द्यायचे .नकळत आम्हाला पण प्रोत्साहन मिळायचे ..
वर्षभर कामधंदे निमित्त शहरात गेलेले गावचे लोक आवर्जून जत्रेला हजेरी लावायचे ... एसटी टायमाला गावात येणार हे माहित असायचे त्यामुळे गावच्या लोकांना पाहुण्यांना आणायला लोक स्टँड वर जायचे ,जेवणाचे खास बेत आखले जायचे ....
खरे तर त्यावेळी देखील सरपंच असायचे , पाटील असायचे पण गावागावात त्याकाळी राजकारणाचा लवलेशही नव्हता . सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन गावची जत्रा आनंदात पार पाडत...त्यामुळे भांडण तंटा दूरच पण बाहेरगावी आपल्या गावाच्या एकीचे प्रदर्शन व्हायचे ...
गरीब ,श्रीमंत भेदभाव नव्हता.. ज्येष्ठ नागरिकांचा दबदबा असायचा आणि ते जेष्ठ नागरिक ही जबाबदारीने वागायचे ...गरीबांना सांभाळून घ्यायचे .. जत्रेच्या निमित्ताने ग्रामदैवतांची मिरवणूक ..वेगवेगळ्या पद्धतीने पूजा अर्चा...सर्वत्र आनंदमयी वातावरण असायचे ... गावातील ज्येष्ठ व्यक्ती जवळून गेला तरी त्याच्या आदर युक्त भीतीने पोरे लपून बसायची तर बायका डोक्यावर पदर घ्यायच्या ... परिस्थितीची कधी लाज नसायची.. शिकायचे मोठे व्हायचे एवढेच काय ते आई-वडिलांचे ऐकायचे व शाळेत जायचे... कसला गुणांचा (मार्कांचा )ताण नव्हता का पहिल्या दुसऱ्या नंबरचा ताण नव्हता..
जत्रेला मात्र आई
.बापाकडे रुपाया
,आठाने मागायचा हट्ट असायचा...
आधुनिकता आली , सर्वजण सधन झाले.. पण माणसा माणसाचा संवाद हरपला, ढोल- ताशा ,लेझीम यांची जागा डी जे सारख्या कर्कश वाद्या नी घेतली ...राजकारणाने आक्रमण केले आणि घराघरात ,गावागावात, भांडण लागली, तमाशातील ती प्रबोधनात्मक वगनाट्य जवळजवळ नष्ट झाली ... कारण मोबाईलवरच तमाशा दिसू लागला .. वगनाट्याची जागा आता नृत्यानी घेतली... तीन तास एका जागी बसून वगनाट्य पाहण्याची क्षमता संपल्याने तमाशा कलावंतांनी देखील प्रेक्षकांची आवड पाहून स्वतः त बदल केला.. ज्यांना तो बदल जमला ते टिकले... मात्र ज्यांना तो बदल जमला नाही,अशा हाडाच्या कलाकारांनी कायमची रजा घेतली... पैसा भरपूर आला पण जगण्याच्या धावपळीत आनंद हिरावून गेला ...
काही गावांनी यातून बोध घेत व्याख्यानमाला ,स्पर्धा असे उपक्रम राबवून रागीष्ठ चिडचिडया झालेल्या तरुणाईचे प्रबोधन सुरू केले...काही गावातून कुस्तीसाठी मैदाने करून प्रोत्साहन दिले जात आहे ..वर्गणी तून गोरगरीबाला कमी व्याजात पैसे देऊन या व्याजाच्या पैशाचा गावच्या विकासासाठी वापर होऊ लागला...या बाबी नक्की सकारात्मक आहेत ... जे गेले ते पुन्हा येणार नाही मात्र जे चांगले होते ते जपले जाईल अशी आशा करू यात ..सर्वजण पुन्हा खरे सुशिक्षित होतील अशी आशा करू यात ... प्रबोधन ,संवाद वाढवण्याचा प्रयत्न करू यात ... विज्ञानाचा सकारात्मक वापर होऊ देत.. आणि पुन्हा पूर्वीसारखा गावातील एकोपा वाढू देत हीच ग्रामदैवताला प्रार्थना करूयात .आणि यंदाची जत्रा साजरी करू यात ...
दरवर्षी चैत्र पालवी फुटू लागताच हिंदू नववर्षाच्या आगमन होते, शेतकरी वर्गाची शेतातली कामे बरीचशी उरकेलेली असतात, कामधंदे निमित्त शहरात केलेले लोक काही दिवसांची सुट्टी घेऊन गावी येतात , शाळा नाही सुट्ट्या लागलेल्या असतात,त्यामुळे गावोगावी ग्रामदैवतांची पूजा करून यात्रा जत्रा साजऱ्या केला जातात.. आधुनिक काळात जग जवळ आल्याने अशा यात्रांमध्ये बराचसा बदल झाला आहे .. सध्या सर्वत्र यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे.. त्याबद्दलचा आढावा घेणारा लेख...
ॲड गणेश आळंदीकर,सोमेश्वरनगर,
बारामती