सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खटाव : प्रतिनिधी
उरमोडी कॅनॉलमध्ये बहीण-भावाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शिरसवडी ता. खटाव येथील तळवस्ती येथे घडली आहे.
यातील पाच वर्षांची बालिकेचा मृतदेह सापडला होता, तर सात वर्षीय मुलाचा काल बुधवारी सकाळी गोपूज हद्दीतील आरे नावाच्या शिवारा नजिकच्या कॅनॉलमध्ये मृतदेह सापडला. रिया शिवाजी इंगळे, सत्यम शिवाजी इंगळे अशी मृत बालकाची नावे आहेत. शिरसवडी येथील शिवाजी नानू इंगळे यांची दोन्ही मुले गोपूजवाडा येथे शिक्षण घेण्यासाठी जात होती, मुलगा सत्यम इयत्ता दुसरीत तर मुलगी अंगणवाडीत होती. मंगळवारी शाळा सुटल्यावर मुले अजून घरी नाहीत म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली. त्यानंतर काही वेळाने मुलगी रियाचा मृतदेह कॅनॉलमध्ये आढळून आला.
रियाचा मृतदेह सापडल्यानंतर सत्यमला शोधण्यासाठी ग्रामस्थ, पोलिस व अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु होती. पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत होता. आज सकाळी सत्यमचा मृतदेह आढळून आला. यावेळी शिरसवडी, गोपूज, गुरसाळे आदी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.