सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
होळ ता. बारामती येथिल ग्रामदैवत श्री. भैरवनाथ यात्रेतील तमाशा कार्यक्रमात झालेल्या वादावादीमुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद केला. यात्रा कमिटी मधील पदाधिकाऱ्यानेच मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा केल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त मंगळवार ता. ६ सायंकाळी श्रींचा विवाह सोहळा रात्री छबिना शांततेत पार पडला. बुधवारी ता. ७ दिवसभर तुकाराम खेडकर सह पांडूरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला. रात्री मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे करवडीकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम सुरु होता. एका गाण्यावर कलाकाराने प्रेक्षकांमधून चार चाकी वाहनावर उभे राहुन रंगमंचाच्या दिशेने गाणे गात येत होते. दरम्यान नाचण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाली पुढील भागात बसलेले प्रेक्षक उठल्या मुळे एकच गोंधळ उडाला यात्रा कमिटीतील पदाधिकारी मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरडा करीत असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्यक्रम बंद करावा लागला. मोठ्या प्रमाणात गावांमधून लोक वर्गणी जमा होते पण कमिटीतील काही लोक बेजबाबदार पणे वर्तन करीत असल्यामुळे करमणुकीच्या कार्यक्रमासाठी फुकट पैसे गेले याबाबत तीव्र नाराजी उपस्थितांनी व्यक्त केली.
-----------------------------