सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपूल ग्रामपंचायतीअंतर्गत शेंडकरवाडी
(ता.बारामती ) येथील शेतकऱ्याला बारामतीमध्ये सहा जणांच्या टोळीने पाठलाग करत जबर मारहाण केली होती. याप्रकरणी कुटुंबियांच्या व माध्यमांच्या पाठपुराव्यानंतर बारामती पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. मात्र आता घटनेस एक महिना झाला तरीही उर्वरित तीन आरोपी अजूनही मोकाटच आहेत.
२४ एप्रिल रोजी भरत शेंडकर हे लासुर्णे येथील शेतकऱ्याच्या शेतात काम करून ट्रॅक्टर घेऊन परतत होते. रात्री आठच्या सुमारास बारामतीच्या मोतीबाग चौकात उभ्या असलेल्या युनिकॉर्न दुचाकीला ट्रॅक्टरच्या मागे अडकवलेल्या अवजाराचा किरकोळ धक्का लागला. यावर दुचाकीचालक व अन्य पाच जणांनी बारामतीत जबर मारहाण केली. एकाने लोखंडी रॉडने गुडघ्याखाली घाव घातला. शेंडकर यांनी भितीने ट्रॅक्टर पळविला. मात्र त्यांचा पाठलाग करत माळेगाव येथील पेट्रोल पंपावर पुन्हा अडविले. तिथेही पुन्हा मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी २ मे रोजी आदेश बाळकृष्ण जाधव (रा. गुणवरे ता. फलटण), निखिल नंदकुमार घोरपडे (रा. पिंपळी ता. बारामती), आकाश शंकर बोराटे (रा. माळेगाव ता. बारामती), सूरज शिंदे (रा. डोर्लेवाडी ता. बारामती), अनिल मेहेर (पत्ता माहिती नाही) व आणखी एक अनोळखी इसमाविरूद्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापैकी माध्यमांच्या पाठपुराव्याने व भारत शेंडकर यांच्या आईच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने बोराटे, जाधव, शिंदे यांना अटक केली गेली होती. ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीतच आहेत.
दरम्यान निखिल नंदकुमार घोरपडे व अनिल मेहेर आणि अज्ञात इसम अशा तीन जणांना मात्र एक महिना होत आला तरीही पोलिस पकडू शकलेले नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहेत.
ऍड. वैभव भोसले म्हणाले, घोरपडे आणि मेहेर यांनी बारामती न्यायालयात अटकपूर्व जामीन मांडला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळलेला आहे.
बारामती शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास नाळे म्हणाले, सहाव्या अज्ञात आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही. नंदकुमार घोरपडे आणि अनिल मेहेर घटना झाल्यापासूनच फरार आहेत. पोलिस पथक त्यांच्या मागावर आहे.
जखमी भरत शेंडकर म्हणाले, आरोपींनी पाय मोडला तरीही पोलिसांना तीन आरोपी पकडण्यासाठी वीस दिवस लागले. उर्वरीत आरोपींचा जामीन फेटाळला असूनही अद्याप त्यांना पोलिस पकडू शकलेले नाहीत. याबाबत नवीन ग्रामीण पोलिस अधिक्षक गीलसाहेब यांना भेटण्यासाठी जाणार आहे. आरोपींनी किरकोळ कारणावरून मोडलेला पाय त्यांना दाखविणार आहे.