सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दिपक जाधव
सुपे (ता. बारामती) येथील गावठाण तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने लवकरच सुपेकरांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. तसेच जनाई योजनेचे पाणी बंद झाल्याने सुपेकरांना पाणी टंचाईच्या झळा अधिक बसणार आहेत. येथील तलावात जनाईचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मागिल एक महिण्यापासुन सुपेकरांना पाणी टंचाईच्या झळा जाणवु लागल्या आहेत. मात्र जनाईचे पाणी ओढ्याद्वारे शासकिय विहिरींपर्यत आल्याने पाणी पुरवठा सुरळीत झाला होता. येथील गावठाण तलावात जनाईचे पाणी सोडण्याची मागणी होती. मात्र जनाईचे पाणी देण्यात आले नाही. त्यामुळे तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने या अंतर्गत असणाऱ्या शासकीय विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तसेच गावातील खाजगी विहिरी व शासकीय कूपनलीकांची पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे सुपेकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
येथील खालच्या पेठेतील शासकीय नळपाणी पुरवठ्याची विहिरीनी तळ गाठला आहे. सद्या दिवसाआड येणारे पाणी चार दिवसाआड सोडण्यात येत आहे. तसेच या तलावांतर्गत असलेली चांदगुडेवाडी, काळखैरेवाडी या ग्रामपंचायतीचा शासकिय नळपाणी पुरवठा या तलावावरच अवलंबुन आहे. त्यामुळे येथील तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. येथील तलावात जनाईतुन पाणी सोडल्यास या परिसरातील वाडीवस्त्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होऊ शकतो. तसेच टॅंकरच्या जादा खेपा याठिकाणाहुन होऊ शकतात अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
दरम्यान येथील सरपंच तुषार हिरवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की नळपाणी पुरवठ्याच्या शासकीय विहिरीने तळ गाठला आहे. मात्र तलावात असलेल्या विहिरीवरुन गावचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. उद्या ( सोमवारी ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असल्याने त्यांची भेट घेवुन जनाईचे पाणी सोडण्याबाबत चर्चा करणार असल्याचे हिरवे यांनी सांगितले.
------------------------
जनाईचे पाणी न मिळाल्याने सुमारे दोनशे एकर ऊसाला फटका
जनाईच्या पाण्यापासुन पानसरेवाडी, काळखैरेवाडी आणि बाबुर्डी वंचित राहिले आहे. येथील शेतकऱ्यांनी जनाईच्या अधिकाऱ्यांकडे पाण्याची वेळोवेळी मागणी केली होती. येथील शेतकऱ्यांनी पैसे भरण्याची तयारी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. आज ( रविवारी ) सकाळीच जनाई योजनेचे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे या तीन गावातील सुमारे दोनशे एकर ऊसाला फटका बसणार आहे.
-----------------------------
आमच काय चुकलं, बाबुर्डीकरांची दादांना आर्त हाक
खासदार आणि आमदारकीच्यावेळी तालुक्यातील राजकिय वातावरण वेगळे होते. मात्र आम्ही विरोध पत्करुन दादांना भरभरुन मतं दिली. अन जनाईचे पाणी एक महिना चालुनही आम्हाला पाणी मिळाले नाही. पैसे भरायला तयार होतो, मात्र नंतर पैसे भरा असे अधिकारी सांगत होते. आता पाणी बंद झाले त्यामुळे पिकं जळुन जाणार. त्यामुळे दादा तुम्हीच सांगा आमच काय चुकलं अशी आर्त हाक बाबुर्डीकरांनी दादांना दिली आहे.