Phaltan Breaking l तरडगावात ग्रामदैवत यात्रेत दोन गटात हाणामारी : २२ जणांना अटक, १६ जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील तरडगाव येथील ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त करमणूकीच्या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या वादातून दोन्ही बाजूकडील सुमारे २२ जणांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे तर यापैकीच १६ जणांविरोधात अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
          या प्रकरणी फिर्यादी प्रदीप गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीनुसार दि.३० रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास वेणूताई हायस्कूल तरडगाव याठिकाणी चालू असलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमादरम्यान प्रतिक उर्फ भैय्या कुमार गायकवाड हा मादक द्रव्य घेऊन नाचत असल्याने त्यास दीपक गायकवाड , संतोष कुंभार यांनी नाचू नको शांत बसून कार्यक्रम बघ असे सांगितले त्यावेळी वरिल आरोपी यांने फिर्यादींचे काही एक ऐकले नाही म्हणून फिर्यादीने त्यास बाजूला घेतले म्हणून चिडून जाऊन त्याच्यासोबत असलेले प्रतिक उर्फ भैया कुमार गायकवाड, सुमेध संदीप गायकवाड, बादल दिनेश गायकवाड, सुहास जनार्दन गायकवाड, अजय आनंदा ननवरे, अमित आनंदा ननावरे , आयुष बनसोडे व इतर 15 ते 20 मुलांनी फिर्यादी यांना पाठीमागून मारहाण करणे सुरुवात केली त्यात कोणीतरी फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारला व दगड लागून जखम होऊन रक्त आले म्हणून वरील सर्वांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे असून या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करत आहेत.
दरम्यान दि.३० रोजी वेणुताई चव्हाण हायस्कूल तरडगाव येथील मैदानात मनोरंजनात्मक कार्यक्रमादरम्यान फिर्यादी करूणा दिनेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री ११ वाजताच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा बादल गायकवाड हा उभा राहून नाचू लागला म्हणून ऑर्केस्ट्रा बघणे करता आलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला मारहाण केली , फिर्यादी भांडणे मिटवण्यासाठी गेले असता फिर्यादीला देखील मारहाण करण्यात आली, यादरम्यान फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून कोठेतरी गहाळ झाले. त्यानंतर फिर्यादीचे जातीतील इतर बायका सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्यादी लोणंद पोलीसांत दाखल करण्यात आली आहे. 
सदर घटनास्थळी लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी भेट देऊन दोन्ही बाजूकडील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले व यात्रेदरम्यान चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणात आरोपी ओंकार सोपान गायकवाड, आदित्य शंकर गायकवाड , अक्षय दत्तात्रय गायकवाड , संतोष वसंत गायकवाड, प्रदीप शिवाजी गायकवाड, मयूर शिवाजी गायकवाड, यश संतोष गायकवाड , अक्षय हिवरकर ,राहुल विजय गायकवाड , सुदाम रामदास गायकवाड , तुकाराम नवनाथ गायकवाड , सौरभ महेंद्र गायकवाड, धीरज शरद गायकवाड , महेश नवनाथ गायकवाड ,रणजीत यशवंत गायकवाड , सागर वसंत गायकवाड व इतर आठ ते दहा जण सर्व राहणार तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस करत आहेत.
To Top