सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर - कापूरव्होळ मार्गावरील येवली ता.भोर येथे जागेच्या वादातून दोन गटात शुक्रवार दि.९ रोजी राडा होऊन तुफान हाणामारी झाली.
याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी शनिवार दि.१० रोजी रात्री उशिरा तब्बल १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या गटातील फिर्यादी सूर्यकांत सोपान खंडाळे (वय ५८ वर्ष, रा. येवली, ता. भोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी हे शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरासमोर बसले असताना आरोपींनी जमाव जमवून येथे बांधकाम करणार असे म्हणून हाताने, लाथाबुक्याने, खोऱ्याने व काठीने फिर्यादी यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी किरण विष्णू खंडाळे, विष्णू दिनकर खंडाळे, नवनाथ सिताराम खंडाळे, सिताराम दिनकर खंडाळे, आदिनाथ सिताराम खंडाळे, रूपाली नवनाथ खंडाळे, केतकी आदिनाथ खंडाळे, श्रीनाथ सिताराम खंडाळे (सर्व रा.येवली, ता. भोर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या गटातील फिर्यादी केतकी आदिनाथ खंडाळे (वय ३८ वर्ष, रा.येवली, ता. भोर) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी या शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक करत होत्या.त्यावेळी अचानक त्यांना घराबाहेर भांडणे झाल्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी पाहिले की, त्यांचे चुलत दिर किरण विष्णु खंडाळे हे खाली पडले होते. त्यावेळी त्यांना विरोधी गटातील लोक हाताने, लाथाबुक्क्यांनी, काठीने व लोखंडी गजाने मारहाण करत होते. यावेळी फिर्यादी यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी गळ्यातील मंगळसूत्र ओढुन नेऊन अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.याप्रकरणी चंद्रकांत सोपान खंडाळे, सुर्यकांत सोपान खंडाळे, भिमाजी एकनाथ खंडाळे, रामदास दशरथ खंडाळे, सुनिता चंद्रकांत खंडाळे, संगिता रामदास खंडाळे, सारीका भिमाजी खंडाळे, राजेंद्र विठ्ठल खंडाळे (सर्व रा. येवली, ता. भोर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.जे. खोत करीत असून दोन गटात झालेल्या या हाणामारीमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यांनतर भोर पोलिसांनी तातडीने दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.