सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
वीसगाव खोऱ्यातील ग्रामदैवतांच्या मंदिरातील चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच पळसोशी ता.भोर येथील ग्रामदैवत वाघजाई देवी मंदिरातील दानपेटी चोरून दानपेटीतील ३० ते ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवार दि.५ रोजी घडली. अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली.
चोरट्यांनी सध्या घरे तसेच दुकाने फोडण्याकडे पाठ वळवली असून ग्रामदैवतांच्या मंदिरांमध्ये चोऱ्या करण्याकडे मोर्चा वळविला आहे. चोरटे राजरोसपणे चोरी करू लागले असून मागील एक महिन्याच्या कालावधीत नेरे ता.भोर येथील ग्रामदैवत बालसिद्धीनाथाचा १ किलो चांदीचा मुखवटा, गोकवडी येथील देवीची २५ ते ३० हजार रोकड असलेली दानपेटी तर पळसोशी येथील वाघजाई देवीच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळून नेल्याची घटना घडली.जवळजवळ या चोऱ्यांच्या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.राजरोसपणे दिवसाही चोरटे चोरी करत असल्याने वीसगाव खोरे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पळसोशीच्या मंदिरातील दानपटी चोरून नेतानाचा चोरट्याचा क्षण सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. लवकरच अज्ञात चोरटेच्या विरोधात भोर पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.