सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर बस स्थानकातून चिखलगाव ता.भोर येथे लग्नासाठी जाणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील ४ लाख ५० हजार किमतीच्या सोन्यावर एसटीत चढताना अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना गुरुवार दि.१५ घडली.याची फिर्याद भोर पोलिसात कल्पना राजेश वरे (रा.वरवडी खुर्द ता.भोर सद्या रा.मुंबई )दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला मुलांसह मुंबईहून चिखलगाव ता.भोर येथे माहेरी लग्न समारंभासाठी जात होती.यावेळी भोर बस स्थानकावर मोठी गर्दी होती.कल्पना वरे ही महिला गुरुवार दि.१५ दुपारच्या दरम्यान चिखलगाव एसटी बसमध्ये गर्दीत चढताना अज्ञात चोरट्यांनी यांच्या मोठ्या पर्स मधील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील फुले, वेल ,नेकलेस तसेच चांदीचा छल्ला, जोडवी याबरोबरच १० हजार रुपये रोख रक्कम असलेली छोटी पर्स लंपास केली.या घटनेत वरे यांची ४ लाख ५० हजारांची चोरी झाली असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.