सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
हिंदु- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या सुपे (ता. बारामती) येथील ख्वाजा शाहमन्सुर बाबांच्या उत्सवास (उरुसास) गुरुवार पासुन (दि. १५ ) सुरुवात होत आहे.
येथील गुरुवारपासुन चार दिवस चालणाऱ्या उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सकाळी दहा वाजता ( गुरुवारी ) बाबांच्या समाधीस ग्रामस्थांच्यावतीने शाहीस्नास घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी बाबांच्या महावस्त्राची (गल्लफ) रात्री दहा वाजता काढलेली मिरवणुक (छबिना) पहाटे चार वाजेपर्यंत सुरु असते. या मिरवणुकीत सनई, ढोल व ताश्यां आदी विविध वाद्य वृंदांचा समावेश करण्यात येतो.
शुक्रवारी (दि. १६ ) उरुसाचा मुख्य दिवस मानला जातो. या दिवशी पहाटे बाबांच्या समाधीला चंदन - अत्तराचा लेप लावुन महावस्र (गल्लफ) चढविण्यात येते. यावेळी येथील पहिला मान हिंदू - कासार समाजाला आहे. त्यानंतर दिवसभर नवसाचे दंडवत तसेच संध्याकाळी गोड नैवद्य दाखवुन नवसाचे दिवे पाजळण्याचा कार्यक्रम करण्यात येतो. यावेळी ग्रामस्थांसह पै- पाहुणे बाबांच्या दर्शनासाठी दर्गा आवारात गर्दी करतात. रात्री ग्रामस्थांच्यावतीने नविन जुन्या हिंदी - मराठी गाण्यांच्या ऑर्केस्ट्राचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी ( दि. १७ ) दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. तसेच रात्री दहाच्या दरम्यान प्रसिद्ध कव्वाल अमन साबरी आणि अब्दुल हबिब अजमेरी यांchaa बहारदार कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. तर रविवारी (दि. १८ ) दहा वाजता सार्वजनिक नमाज पठण होवुन आलेल्या भाविकांना गोड महाप्रसादाचे वाटप करुन उरुसाची सांगता होणार असल्याची माहिती दर्गा कमेटीचे मुख्य विश्वस्त हमीद डफेदार आणि उपाध्यक्ष युनूस बागवान यांनी दिली.
________________