सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
आंबेगाव बुद्रुक परिसरात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह सर्व्हिस रोडलगत असलेल्या नाल्याजवळ टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रिती सचिन वखारे (वय ३१, रा. खोपडेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक समीर कदम यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ मे रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. पावसातच आंबेगाव बुद्रुक परिसरातील धबाडी येथील सर्व्हिस रोडलगत असलेल्या नाल्याजवळ दगडात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानूसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेची ओळख पटली नव्हती. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविला. तसेच, याप्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास सुरू केल्यानंतर महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.