Sugar Factory l अपहार केलेली ५४ लाख ४७ हजारांची वसुली : सोमेश्वर कारखाना टाईम ऑफिस अपहार प्रकरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या टाईम ऑफीसमध्ये अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. आता कारखान्याने अपहार करणाऱ्या रूपंचंद् साळुंखे यांच्याकडून अपहार व कर अशी मिळून ५४ लाख ४७ हजार रूपयांची वसुली करण्यात यश मिळवले आहे. 
         रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नावापुढे बोगस हजेरी दाखवून त्याचे पैसे उकळण्याचा प्रकार टाईम ऑफीसव्दारे होत होता. यानंतर कारखान्याच्या संचालक मंडळाने टाईम ऑफीसचे अधिकारी व कामगार असे सहा जण आणि एक कंत्राटदार या सर्वांना एकाच वेळी निलंबित केले होते व चौकशी करण्याचा निर्णय़ घेतला होता.  
साखरआयक्तालयाच्या पॅनेलवरील मेहता-शहा चार्टर्ड अकौटंट कंपनीने डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०२५ या आठ वर्ष कालावधीतील कारभाराची तपासणी केली. यामध्ये ५४ लाख २९ हजार रूपयांचा अपहार झाल्याचे निश्चित झाले होते. दरम्यान, विधिज्ञ अॅड. मिलिंद पवार यांच्या समितीने कर्तव्यात कुचराई केल्याचा ठपका कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांच्यावर तर अपहाराचा ठपका रूपचंद साळुंखे याच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान, विलास निकम, दीपक भोसले, सुरेश होळकर, श्री. बनकर हे चौघे कामगार व कंत्राटदार शशिकांत जगताप यांनी कुठलाही अपहार केला नसल्याचे निष्पन्न झाले होते. सहकार कायद्यान्वये कायदेशीर कारवाईसाठी व वसुलीसाठी अॅड. मंगेश चव्हाण यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने सर्वांना म्हणणे मांडण्याची संधी देत रूपचंद साळुंखे याच्याकडून टप्प्याटप्प्याने अपहाराची रक्कम भरून घेण्यात यश मिळविले आहे. रकमांची वसुली केल्याचे सभासदांमधून स्वागत होत आहे मात्र आता आता साळुंखे व निंबाळकर यांच्यावर समिती निलंबनाची कारवाई करणार की गुन्हे दाखल करणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. तसेच निर्दोष असलेले निकम, भोसले, होळकर, बनकर यांना न्याय कधी मिळणार याचीही चर्चा होत आहे.  
कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले, कराच्या रकमेसह एकूण ५४ लाख ४७ हजारांची वसुली करण्यात यश मिळाले आहे. सर्व रकमा रूपचंद साळुंखे याने भरल्या आहेत. आता अॅड. चव्हाण समिती खात्यांतर्गत चौकशी लवकरच पूर्ण करून दीपक निंबाळकर व रूपचंद साळुंखे यांच्यावर कारवाई प्रस्तावित करेल. जबाबदार नसलेल्या लोकांना त्यानंतर रूजू करण्याचा निर्णय संचलाक मंडळ घेईल.
To Top