सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
श्री क्षेत्र संगमबेट- वाळकी येथुन प्रस्थान ठेवलेल्या श्री संतराजमहाराज पालखीचे सुपेकरांच्यावतीने उत्साहात स्वागत केले.
या पालखीने छप्पन मेरु घाटाचे चढण पार करुन सुप्यात प्रवेश केल्यावर पालखी लोणकरमळा येथे विसावली. यावेळी येथे भारुडाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पालखी सोंड परिसरात येताच ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे, ग्रा. पं. सदस्य शफिक बागवान, विशाल चांदगुडे, अश्विनी सकट, नयना जगताप, मयुरी लोणकर, वैष्णवी बारवकर, मल्हारी खैरे, हभप प्रमोदमहाराज जगताप, अशोक लोणकर, अशोक बसाळे, महेश चांदगुडे, सुयश जाधव, ग्रामसेवक सतिश बोरावके आदींसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वागत झाल्यानंतर पालखी सुपे गावाकडे मार्गस्थ झाली.
यावेळी टाळ मृदंगाच्या निनादात विठ्ठल विठ्ठल म्हणत येथील ग्रामस्थांची भजनी दिंडी पालखीस सामोरी गेली. यावेळी पालखी आगमनाने येथील वातावरण भक्तीमय झाले होते. तसेच सकाळी मुख्य पेठेतुन प्राथमिक शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीद्वारे विद्यार्थ्यांनी हातात फलक घेवुन समाजप्रबोधन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या तसेच विठ्ठल - रुख्मिणिची वेशभुषा साकारण्यात आल्याची माहिती साधना लोणकर यांनी दिली.
येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी वरच्या पेठेतील शहाजीराजे मैदानावर विसावली. यावेळी अश्वमेघाचे मोठे गोल रिंगण झाले. येथील रिंगण सोहळा पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने पालखी मार्गावर स्वागत कमाणी टाकण्यात आल्या होत्या. तसेच पालखी तळ आणि त्या मार्गावरील स्वच्छता, दिवाबत्तीची सोय व डास प्रतिबंधात्मक फवारणी, वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण, सीड बॉल वाटप करण्यात आल्याची माहिती सरपंच तुषार हिरवे यांनी दिली.
त्यानंतर हरिनामाचा गजर करीत मुख्यपेठेतुन पालखी मुक्कामी स्थळाकडे मार्गस्थ झाली. पालखी तुकाई मंदिरात विसावल्यावर सार्वजनिक महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. येथील ग्रामस्थांच्यावतीने मिष्टान्न भोजन वारकऱ्यांना देण्यात आले. यावेळी येथील जय भवानी तरुण मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमोद जगताप यांचे वाटचालीचे किर्तन झाले.
दरम्यान पालखी प्रमुख नामदेव महाराज साठे म्हणाले की, संतराज महाराज पालखी सोहळ्याचे हे ५९ वे वर्षे आहे. तर यावर्षी वारकऱ्यांच्यासंख्येत वाढ होवुन सुमारे ३ हजार वारकरी पालखीसमवेत आहेत. त्यांच्या निवाऱ्यासाठी २०० राहुट्याची सोय करण्यात आली आहे. तर पालखीसमवेत चार पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, बिछान्यासाठी चार टॅंकर, दोन ॲंब्युलन्स, आमदार माऊली कटके यांनी वारकऱ्यांसाठी साडेपाच हजार रेणकोटचे मोफत वाटप केले. वारकऱ्यांच्या सोईकरीता वाखारी येथे १ कोटी २१ लाख खर्चाची दोन एकर जागा घेण्यात आली आहे. त्यासाठी आमदार राहुल कुल यांच्याकडुन ५ लाख आमदार माऊली कटके यांच्याकडुन ५ लाख ११ हजार तर संतराज महाराज पंचक्रोशितील वारकऱ्यांच्या सहाकार्यातुन इतर रक्कम जमा झाल्याचे साठे यांनी सांगितले.
यावर्षी पालखी रथाला नागरगाव आणि सादलगाव येथील शेतकऱ्यांची बैलजोडीचा मान आहे. तर डॉ. सुधीर पवार, डॉ. आप्पासहेब दिवेकर आणि डॉ. विशाल रणदिवे यांच्यावतीने वारकऱ्यांना मोफत वैद्यकिय सेवा देण्यात येते. तर पालखी रथाला दिवसाआड मच्छिंद्र आडागळे गृपच्यावतीने विनामुल्य फुलांची सजावट करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष साठे यांनी दिली.
____________________