Baramati News l गुरू हे आयुष्याला आकार देण्याचे काम करतात : हभप आरती गवळी ! विद्या प्रतिष्ठानमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला कीर्तन सोहळा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

आयुष्य आई-वडील प्रदान करतात.. परंतु खऱ्याअर्थाने शाळा- महाविद्यालयांतीत गुरू हे आयुष्याला मूर्त आकार देण्याचे काम करत असतात, असे मत कीर्तनकार हभप आरती गवळी यांनी व्यक्त केले. 

         विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील शाळेत आजच्या गुरुपौर्णिमेच्या औचित्यने कीर्तन सादर करण्यात आले. पंढरपूरची आषाढ वारी व  गुरू पौर्णिमा यांचा सुरेख समन्वय साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात गुरूंचे महत्त्व मुलांना सोप्या बोधात्मक कथा मधून सांगण्यात आले. शाळेतील शिक्षिका व हभप आरती गवळी व त्यांच्या शाळेतील टाळकरी विद्यार्थ्यांच्या समूहाने वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले. यावेळी नाथ गुरुपरंपरेवर आधारित अभंग किर्तन सेवेसाठी घेऊन अत्यंत सोप्या व मार्मिक शब्दात गवळी यांनी मुलांना गुरुचे महत्व व आपल्या आयुष्यातील त्यांचे स्थान समजावून सांगितले. 

 या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संगीत साथ शाळेतील संगीत शिक्षक अजित भापकर व सौरभ जाधव यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी विद्यार्थी व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. शाळेतील इयत्ता ‌ तिसरी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली. रूपाली कदम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


To Top