सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
सासवड (ता.पुरंदर) येथील प्राजक्ता विराज जगताप-कुरुलकर यांनी सनदी लेखापाल (सी ए) ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मे २०२५ मध्ये झालेल्या सी.ए. अंतिम परीक्षेत यश संपादन करून प्राजक्ता यांनी आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे.
प्राजक्ता यांचे शालेय शिक्षण सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. त्यांना इयत्ता ४ थी मध्ये शिष्यवृत्ती मिळाली होती. विशेष म्हणजे, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत त्या इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वी मध्ये सलग राज्यस्तरीय शिष्यवृत्तीच्या मानकरी ठरल्या होत्या. याशिवाय, इयत्ता ८ वी मध्ये ऑल इंडिया मॅथ्स अँड सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत त्यांनी भारतातून तिसरा क्रमांक पटकावून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली होती. इयत्ता १० वी मध्ये त्यांनी शाळेत सर्वप्रथम येत ९२.२५ टक्के गुण मिळवले होते.
महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथील आर. ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, माटुंगा, मुंबई येथून घेतले. १२ वी मध्ये त्यांना ८८.९० टक्के गुण मिळाले. सी.ए.च्या खडतर प्रवासात त्यांनी फाउंडेशन आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या. एम. पी. चितळे, फोर्ट, मुंबई या सी.ए. फर्ममध्ये त्यांनी तीन वर्षांची आर्टिकलशिप पूर्ण केली.
प्राजक्ता यांच्या या प्रवासात त्यांचे काका सी.ए. रितेश पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले. सासवडमधील नामांकित वकील प्रकाश विष्णुपंत दीक्षित यांच्या त्या नात असून, उद्योजक विजय जगताप आणि सासवडचे माजी उपनगराध्यक्ष उमेश जगताप यांच्या त्या स्नूषा आहेत.