सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर -महाड मार्गावरील वरंधा घाटात पश्चिमेकडील भागात पाऊस सुरू असतानाच रस्त्याचे काम चालू असल्याने मातीमय रस्त्यामुळे स्थानिक तसेच महाडला ये-जा करणाऱ्या वाहनांना वाहने चालवताना अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान आठ ते दहा ठिकाणी मातीमय रस्त्यावरून ये -जा करताना वाहने मातीत खचू लागल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
मागील एक वर्षापासून वरंधा घाटातील आठ ते दहा किलोमीटर रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून काम संथ गतीने सुरू असल्याने वाहन चालकांना प्रवासावळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यातच सध्या पावसाळा सुरू असताना रस्त्यावरील मोऱ्या बदलण्याचे काम चालू असल्याने वाहने चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.तर अनेकांची वाहने मातीमुळे रस्त्यावर रुतून राहत आहेत.यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागत आहेत.पावसाळ्यात रस्त्याचे काम सुरू आहे रस्त्याच्या साईड पट्टीला माती टाकल्याने गाड्या मातीत रुतून बसतात. या गाड्या बाहेर काढण्यासाठी वाहनचलकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.चिखलात रुतलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी तासंतास वेळ जातो. वाहनचालक या मार्गावरून प्रवास करताना त्रास होऊन जात आहेत.तर चिखलमय रस्त्यावरून दुचाकी वाहनचालक घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत.ठेकेदाराने पावसाळ्यात काम थांबवावे अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच शिरगाव ता.भोर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पोळ यांच्याकडून होत आहे.