Breaking News l समुद्रात पोहण्याचा मोह जिवावर बेतला...! आरे वारे बीचवर चौघांचा बुडून मृत्यू, पती-पत्नीसह दोन बहिणींचा समावेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
रत्नागिरी : अमित मोरे
रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्र किनारी पोहण्याचा मोह अनावर झालेल्या रत्नागिरीतील चौघांचा बुडून मृत्यू झाला. दि. १९ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
         एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये तीन तरुणी व एका तरुणाचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. शहरातील ओसवालनगर येथील दोघे आणि मुंब्रा येथील दोघांचा यामध्ये समावेश आहे. या दुर्घटनेने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
        जुनेद बशीर काझी (वय ३०), पत्नी जैनब जुनेद काझी (वय २८, दोन्ही रा. ओसवालनगर रत्नागिरी), उजमा शमशुद्दीन शेख (वय १७), उमेरा शमशुद्दीन शेख (वय १६, दोन्ही रा. मुंबई-मुंब्रा) अशी मृतांची नावे आहेत. काझी कुटुंबीय हे ओसवालनगर येथे भाड्याने राहतात. त्यांच्याकडे मुंब्रा येथील पाहुणे म्हणून उमेरा आणि उजमा या तरुणी आल्या होत्या.
         काल सायंकाळी ५ वाजता दुचाकी घेऊन ते आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेले. समुद्र खवळलेला होता. दुपारी पावसाला सुरुवात झाली होती. त्यावेळी या चौघांना पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही. उसळणाऱ्या लाटांचा अंदाज त्यांना आला नाही. अचानक उसळलेल्या लाटांनी हे चौघेही पाण्यात ओढले गेले. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी त्यांनी आकांत सुरू केला.
          काही वेळ एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. काही प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरड सुरू केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांनी बुडालेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचेही प्रयत्न असफल ठरले. सायंकाळी सात वाजता त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
To Top