Breaking News l जनावरांच्या लम्पी आजारामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय : शर्यती भरवणे, जनावरांचे बाजार भरवताना या अटींचे करावे लागणार पालन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात ९ तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोग संसर्गजन्य रोगाचा गोवर्गीय जनावरांमध्ये संसर्ग झालेल्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहे. तसेच लम्पी चर्म रोगाचा फैलाव इतरत्र होवू नये यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाह्य किटक नियंत्रण कार्यक्रम राबविण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
           लम्पी चर्म रोगावर नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करता येईल आणि (गुरे) आणि गोजातीय प्रजातींमधील इतर सर्व प्राणी (म्हैस वर्गीय वगळून) यांना पालन करण्याच्या ठिकाणापासून नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण किंवा वाहतूक करण्यापूर्वी किमान २८ दिवस अगोदर लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगावे. गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे किंवा बाजारातील खरेदी विक्री करणे, शर्यती आयोजित करणे, जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे आदीमध्ये सहभागी होणारी सर्व गोवर्गीय प्रजातीच्या जनावरांचे २८ दिवस अगोदर लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला सादर करणे बंधनकारक राहील.
           बाधित गोजातीय प्रजातीचे जिवंत अथवा मृत प्राणी, त्यांच्या संपर्कात आलेले वैरण, गवत किंवा अन्य साहित्य तसेच त्यांचे शव, कातडी, कोणताही भाग अशा प्राण्यापासून अन्य कोणत्याही उत्पादन नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करण्यात येत आहे.
प्रयोगशाळा निदानामध्ये जिल्ह्यातील ज्या भागात पशुपालकांचे गोजातीय प्रवर्गातील जनावरांना लम्पी चर्म रोगाची लागण झाल्याचे निष्कर्ष होकारार्थी येतील अशा ठिकाणापासून ५ कि.मी. त्रिजेच्या परिघामधील सर्व संक्रमित न झालेले जनावरांचे रिंग व्हॅक्सीनेशन त्वरीत करुन घ्यावेत. या रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही याबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.
To Top