Satara-Koregaon l सतीश गायकवाड l कोरेगाव पोलिसांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोरेगाव : सतीश गायकवाड
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथील निवासस्थानी बेकायदेशीररित्या प्रवेश करून कोरेगाव पोलीस ठाण्यातील शिपाई अक्षय सुरेश शिंदे यांनी एका गुन्ह्याबाबत चौकशी केली.
          एकूणच आमदार शशिकांत शिंदे यांच्या बदनामीचा हा प्रयत्न आहे. याप्रकरणी तात्काळ कोरेगाव पोलीस ठाण्यासह संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. 
पक्षाचे युवा नेते साहिल शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ, किसनवीर साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने, कोरेगाव बाजार समितीचे माजी सभापती ॲड. पांडुरंग तथा पी. सी. भोसले, कोरेगाव नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत आनंदराव बर्गे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रीतम बर्गे, गणेश धनवडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी चार वाजता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व घडल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत सविस्तर माहिती दिली. आमदार शशिकांत शिंदे यांचे पत्र देखील यावेळी पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले. 
कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस शिपाई अक्षय सुरेश शिंदे याने बेकायदेशीररित्या बुधवारी दुपारी आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करण्याचा प्रकार केला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
वास्तविक पाहता एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी जात असताना त्या लोकप्रतिनिधीला त्याबाबतची कल्पना पोलीस अधिकाऱ्यांनी देणे अथवा पत्रव्यवहार करणे हे क्रमप्राप्त असते. मात्र अशी कोणतीही कल्पना न देता कोरेगाव पोलीस ठाण्याकडून असा प्रकार घडला असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 
पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असून कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये एकतर्फीपणाने यंत्रणा काम करत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित पोलीस शिपाई अक्षय शिंदे हा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे चौकशी करण्याचे कामकाज करत आहे. बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा सर्व प्रकार स्पष्ट दिसून येत आहे. एकूणच सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांसह कोरेगाव पोलीस ठाण्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी घटनेची बारकाईने माहिती घेतली. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे याविषयी चौकशी सोपविली जाईल, त्यांचा अहवाल आल्यानंतर आणि त्यात संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
दरम्यान, तत्पूर्वी साहिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुपारी कोरेगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर प्रश्नांची सरबती केली. संबंधित पोलीस कर्मचारी आता कोठे आहे ?,  त्याला कोणी आदेश दिले होते ?, आपण कोणती कारवाई केली ? या प्रश्नांना निरीक्षक बल्लाळ यांनी अत्यंत जुजबी उत्तर दिले. पोलीस निरीक्षक बल्लाळ हे केवळ चर्चा करत असुन कोणतीही कारवाई करणार नाही, हे लक्षात येताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साताऱ्यात धाव घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेतली आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.

२८ जुलैला पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन 
दरम्यान, कोरेगाव पोलिसांकडून घडल्या प्रकाराबाबत आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पोलीस यंत्रणा एखाद्या राजकीय पक्षाने दिशानिर्देशाप्रमाणे काम करत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची कृती पूर्णपणे चुकीची असून ते पोलीस शिपाई अक्षय शिंदे याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवार दिनांक २८ जुलै रोजी मी स्वतः कोरेगावात येत असून पक्षाच्यावतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असून बल्लाळ यांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत पोलीस शिपाई अक्षय शिंदे याच्यावर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
To Top