सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
यवत : प्रतिनिधी
भोर- वेल्हा-मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांना अटक करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी बाळासाहेब मांडेकर यांना अटक करण्यात आली आहे.
कला केंद्रातील गोळीबाराप्रकरणी बाळासाहेब मांडेकर यांच्यासोबत गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील चंद्रकांत मारणे अद्याप फरार असून त्याचाही शोध सुरु आहे. दरम्यान, अटक झालेल्या तिघांचीही कलाकेंद्रातील नृत्यांगणा आणि अन्य उपस्थितांसमोर ओळख परेड होणार आहे. त्यानंतर तिघांची नावे आणि अन्य माहिती उघड केली जातील, अशी माहिती आहे. चौफुला परिसरात 3 कला केंद्र आहेत. यातील न्यू अंबिका आणि अंबिका कला केंद्र ही दोन्ही एकाच मालकाची आहेत. यात गाणी, नृत्य, लावणी अशा कला सादर केल्या जातात. सोमवारी रात्रीही नेहमीप्रमाणे तिन्ही कला केंद्रांमध्ये कार्यक्रम सुरु होते. मात्र दोन गटांमध्ये आवडीची लावणी सादर करायला लावण्यावरून बाचाबाची झाली. त्यातूनच गोळीबार झाला. यात एक नृत्यांगणा जखमी झाल्याची चर्चा आहे.
मंगळवारी सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला तिन्ही कलाकेंद्र मालकांनी कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास सुरु केला. यात न्यू अंबिका कलाकेंद्रात गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले.
