सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे येथील उपबाजाराच्या नवीन जागेत सुमारे दीड कोटी रुपयांचे शेतकरी भवन बांधले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने यास नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत सुपे येथील उपबाजारात नवीन शेतकरी भवन बांधले जाणार आहे. त्यासाठी शासनाने १ कोटी ५२ लाख ९६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. यासंदर्भात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवरसचिव माधवी शिंदे यांनी नुकताच ८ जुलैला एक आदेश जारी केला आहे. मात्र हे भवन बांधण्यासाठी शासनाने यातील ७६ लाख ४६ हजार सरकार अनुदान देणार असुन राहिलेली निम्मी रक्कम बाजार समितीला स्वनिधीतुन उपलब्द करावी लागणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. त्यामुळे बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी बांधवांना मुलभुत सुविधा आणि मुक्कामाची सोय होणार आहे.
तसेच सुपे येथील नवीन जागेत शेती मालासाठी ३० गाळे, शेती पुरक व्यवसायासाठी १३ गाळे तर ११ हजार स्क्वेअर फुटाचे शेड हॉल बांधण्यात येणार आहे. यातील शेती पुरक असणारे १३ गाळे व्यवसायीकांनी घेतले आहेत. तर शेती मालाचे ३० पैकी १६ गाळे आडत व्यापाऱ्यांनी घेतले असुन राहिलेल्या १४ गाळ्यांची निविदा लवकरच काढली जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
दरम्यान लोकसभा निवडणुकी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिरायती शब्द पुसण्याबाबत शब्द दिला होता. त्या शब्दानुसार ते सुपे भागाचा विकास करीत असल्याची प्रतिक्रीया सुपेचे सरपंच तुषार हिरवे, बाबुर्डीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी दिली.
...............................