सुपे परगणा l सुप्यात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा : तब्बल ४७ वर्षांनी एकत्र आले विद्यार्थी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे ( ता. बारामती ) येथील श्री शहाजी हायस्कुल मधील १९७७ - ७८ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ४७ वर्षानंतर एकत्र येत संवाद साधला. यावेळी अनेक वर्षांनी जुनी सवंगडी भेटल्याने गप्पा गोष्टी रंगल्या तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा उत्साहात पार झाला. 
          सुमारे ४७ वर्षानंतर एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पाहून आनंद चेहऱ्यावरुन ओसंडुन वाहत होता. यातील सर्वच विद्यार्थ्यांनी वयाची साठी ओलांडल्यामुळे सेवानिवृत्त झालेले आहेत. मात्र यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर काम केल्याचे दिसुन आले. या शाळेविषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञतेच्या व अभिमानाच्या भावना व्यक्त करित असताना बहुतांश विद्यार्थी भावूक झाले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेचे आजीव सदस्य रतनसिंग खैरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील हायस्कुल मध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
      अनेक वर्षांनी सर्व जण एकत्र आल्यानंतर झालेल्या संवादातून माजी सनदी अधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त, सहा. आयुक्त, अप्पर पोलिस अधिक्षक, डॉक्टर, पाठबंधारे विभागाचे शाखा अभियंता, पोस्ट अधिकारी, प्राचार्य, व्यापारी, उद्योजक असल्याचे लक्षात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी चर्चेतुन या ग्रुपमधील काही सवंगड्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
           या विद्यार्थ्यांना अद्यापन करणारे त्या वेळचे शिक्षक बी. एस. कोरेकर, आर. बी. घोलप, बी. ई. शेख, व्ही. बी. नाळे, डी. बी. सपकाळ, ए. बी. नेवसे आदींसह विद्यालयाचे प्राचार्य एस. ए. लोणकर, उपप्राचार्य एस. बी. जमदाडे, माजी प्राचार्य मधुकर ढोबळे उपस्थित होते. या शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
     येथील कार्यक्रम यशस्वी करण्याकामी दामोदर दरेकर, जयराम सुपेकर, दिलीप भोंडवे, राजेंद्र जोशी, बाळासाहेब पवार, डॉ.अंकुश साळुंके, सुधाकर खैरे, मंगल निगडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुधाकर खैरे यांनी केले. सूत्रसंचालन मंगल निगडे, श्वेता जोशी यांनी केले. तर आभार राजेंद्र जोशी यांनी मानले. 
       ..............................................
To Top